ठळक मुद्देपुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे जवान रतन ठाकूर हे शहीद झाले आहेत.भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिलं आहे अशी प्रतिक्रिया रतन ठाकूर यांच्या वडिलांनी या हल्ल्यानंतर दिली आहे. ‘भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिलं आहे. माझ्या दुसऱ्या मुलालाही मी सीमारेषेवर पाठवणार आहे. माझा दुसऱा मुलगाही भारतमातेसाठी देण्यास तयार आहे, पण पाकिस्तानला योग्य उत्तर दिलं गेलं पाहिजे’
नवी दिल्ली - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
शहीद जवानांच्या कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळले आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे जवान रतन ठाकूर हे शहीद झाले आहेत. भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिलं आहे अशी प्रतिक्रिया रतन ठाकूर यांच्या वडिलांनी या हल्ल्यानंतर दिली आहे. ‘भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिलं आहे. माझ्या दुसऱ्या मुलालाही मी सीमारेषेवर पाठवणार आहे. माझा दुसरा मुलगाही भारतमातेसाठी देण्यास तयार आहे, पण पाकिस्तानला योग्य उत्तर दिलं गेलं पाहिजे’ असे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी रतन ठाकूर यांच्या वडिलांनी केली आहे.
दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. तर, मोदीजी पुन्हा एक सर्जिकल स्ट्राईक हवाय, अशी मागणीही अनेकजण करत आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही या हल्लाचा निषेध व्यक्त करताना, आता निषेध व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नसल्याचे म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी देश उभा असल्याचे म्हटले. तसेच, जवानांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचंही मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय.
जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावार पाकिस्तान पुरस्कृत ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल. संपूर्ण भारताला हादरवून टाकणाऱ्या या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी जे काही करावे लागेल ते निश्चितच केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी समस्त भारतीयांना दिली. हा पाकिस्तान आश्रित आणि पुरस्कृत हल्ला आहे. अशा दहशतवादी हल्ल्याने शांततेला सुरुंग लावू पाहणाऱ्यांचा डाव कणखरपणे उधळून लावण्यात सरकार कटीबद्ध आहे, अशी हमी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीयांना दिली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारीलाच गुप्तचर संस्थांकडून पुलवामा IED हल्ल्या होण्यासंदर्भात अॅलर्ट जारी केला होता. यासाठी योग्य ती सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले होते. परिसराची योग्य रितीने तपासणी केल्याशिवाय जवानांचा ताफा पुढील मार्गाच्या दिशेने जाऊ देऊ नका, अशी स्पष्ट सूचना गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली होती. पण, दुर्दैवानं या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जारी करण्यात आलेल्या पत्रकात 9 फेब्रुवारीचा दिवस सर्वांधिक धोकादायक असल्याचाही इशारा देण्यात आला होता. विशेषतः पहाटेच्या सुमारास हल्ला होईल, अशी सूचना जारी करण्यात आली होती. पण बर्फवृष्टी आणि दुरुस्तीच्या कामांमुळे गेले चार दिवस हा राजमार्ग बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, हा मार्ग सुरू झाल्यावर नेहमीच्या तुलनेत जास्त वाहने आणि जवान पाठविण्यात आले. मार्ग मोकळा केल्यानंतर 14 फेब्रुवारीला सीआरपीएफचे जवान 70हून अधिक वाहनांमधून पुलवामा येथे जम्मूहून श्रीनगरच्या दिशेने प्रवास करताना दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला.