कोलकाता : शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तपास अधिकारी आणि कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून देशभरात वातावरण तापले आहे. यातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांच्या एका कार्यक्रमामध्ये 'मेले तरी बेहत्तर, पण तडजोड करणार नाही, टीएमसी नेत्यांना केंद्राने पकडले तेव्हा रस्त्यावर उतरले नव्हते, पण राज्याच्या राजधानीच्या पोलीस आयुक्तांच्या खुर्चीचा अपमान झाल्याने संतप्त झाले आहे.' असे म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलनातून राज्याच्या पोलिसांच्या एका कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमारही उपस्थित होते.
दरम्यान, सीबीआयने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, कोलकाता पोलिस आयुक्तांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.