नवी दिल्ली - आता गुजरात सरकारनंही अहमदाबादचे नामांतर करण्याची तयारी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अहमदाबादचे नाव कर्णावती करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर,कायदेशीर प्रक्रियांसाठी जनतेचे समर्थन मिळाल्यास अहमदाबादचे नाव बदलणार असल्याचे गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. ''कर्णावती नाव जनतेच्या पसंतीस आहे. अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात यावे ही लोकभावना आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळेस आम्ही अहमदाबादचे नाव बदलू'',असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस प्रवक्ते मनिष दोशी यांची टीका मतांच्या राजकारण करायचे असल्याने भाजपाकडून शहरांची नावे बदलली जात आहेत. अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात काहीही अर्थ नाही, असेही दोशी म्हणालेत. हिंदूंची दिशाभूल करण्याचे काम भाजपाकडून होते आहे, असा हल्लाबोलही त्यांनी चढवला.
यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण अयोध्या असे केले.