ऑनलाइन लोकमत
बोनियार (जम्मू आणि काश्मीर) - एलओसी पलीकडून पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांकडून होणाऱ्या कुठल्याही आगळीकीस चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचे भारतीय लष्कराने मंगळवारी सांगितले. लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी कारवाया वाढण्याच्या पार्श्वभूमीवर लष्कराने हे वक्तव्य केले आहे.
"लष्कराची प्रत्यक्ष ताबारेषेवरील तयारी उच्च कोटीची आहे. तसेच एलओसीवर होणाऱ्या कुठल्याही आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे," अशी माहिती लष्कराच्या श्रीनगर येथील 15 व्या तुकडीचे जनरल कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल सतीश दुवा यांनी दिली.
एलओसीवरून घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले, मात्र लष्कराने हे प्रयत्न हाणून पाडल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही काळात एलओसीवर घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले. मात्र दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीतून हे प्रयत्न उधळून लावण्यात आले. चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी लष्कराची तयारी दाखवून देण्यासाठी पुरेशी आहे, असे ते म्हणाले. मात्र सर्जिकल स्ट्राइकबाबत काहीही बोलण्यास दुवा यांनी नकार दिला. लष्कर आणि सरकारने सर्जिकल स्ट्राइकबाबत योग्य ती माहिती दिली आहे असे सांगत त्यांनी याबाबत बोलणे टाळले.