रशियाने युक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांसंदर्भात भारताने प्रतिक्रिया दिली आहे. युद्ध भडकणे कुणाच्याही हिताचे नाही, असे भारताने म्हटले आहे. याच वेळी मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमाने मार्ग काढावा, असा आग्रहही भारताने केला आहे. एवढेच नाही, तर आपण तणाव कमी करण्याच्या दृष्टीने कोणत्याही मदतीसाठी तयार आहोत, असेही भारताने म्हटले आहे.
भारताने युक्रेन युद्ध पुन्हा भडकल्याने सोमवारी चिंता व्यक्त केली आहे. युद्धाचा निर्णय कुणाच्याही हिताचा नाही. यामुळे सर्व पक्षांनी शत्रुत्व टाळून तत्काल मुत्सद्देगिरी आणि संवादाचा मार्ग स्वीकारायला हवा, असे भारताने म्हटले आहे. गेल्य काही दिवसांच्या शांततेनंतर रशियाने सोमवारी युक्रेनच्या काही भागांवर मिसाइल हल्ले केल्यानंतर, माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
बागची म्हणाले, ‘‘आम्ही सर्व पक्षांना तत्काळ शत्रुत्वाचा त्याग करून कूटनिती आणि संवादाच्या मार्गावर परतण्याचे आवाहन करत आहोत. तसेच, स्थिती सामान्य करण्याच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या सर्व प्रयत्नांसाठी भारत तयार आहे. युक्रेनमधील संघर्ष पुन्हा भडकल्याने भारत चिंतित आहे. कारण यात पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आणि अनेकांचा मृत्यू झाला."
रशियाने 24 तासांत 75 क्षेपणास्त्रे डागली - युक्रेनच्या म्हणण्यानुसार, रशियाने युक्रेनवर 24 तासांत 75 क्षेपणास्त्रे डागली आहेत. एजन्सी रिपोर्टनुसार, रशियन हल्ल्यात 8 लोकांचा मृत्यू झाला, तर 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. रशियन हल्ल्यात लिव्ह, पोल्टावा, खार्किव, कीव या शहरांतील अनेक भाग जळून खाक झाले आहेत. या शहरांमधील इंटरनेट सेवाही बंद झाली आहे. या हल्ल्यात डझनहून अधिक गाड्या जळून खाक झाल्या आहेत.