मुंबई- गुजरातमध्ये सलग १२ वर्षे चार महिने मुख्यमंत्रीपदावर काम करणार्या आणि नंतर पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांना आपल्या राज्यातच काँग्रेसला पुन्हा पराभूत करणे सोपे ठरलेले नाही तसेच प्रस्थापितविरोधी लाटेला परतवून काँग्रेसला थोपवणे पंतप्रधानांसमोर मोठे आव्हान बनले आहे. पण गुजरात आणि हिमाचल प्रदेशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि भाजपा यांची कसोटी मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये लागणार आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गेल्याच महिन्यात मुख्यमंत्रीपदावर सलग १२ वर्षे राहण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. चौहान यांच्याआधी मध्यप्रदेशात दिग्विजयसिंह सलग १० वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिलेले मुख्यमंत्री होते. लाडली लक्ष्मी सारख्या अनेक योजना चौहान यांनी राबवल्या असल्या तरी येत्या निवडणुकीत त्यांना व्यापम घोटाळ्याच्या आरोपांना तोंड द्यायचे आहे. तसेच ज्योतिरादित्य सिंदिया, कमलनाथ, दिग्विजयसिंह या विरोधकांच्या एकत्रित फौजेला एकहाती तोंड द्यायचे आहे.
मध्य प्रदेशप्रमाणे छत्तिसगडही पुढच्या वर्षी निवडणुकांना सामोरे जाणार आहे. तेथिल मुख्यमंत्री रमणसिंह हे सलग १४ वर्षे या पदावरती कार्यरत आहेत. इतका काळ सलग मुख्यमंत्री राहण्याचा नरेंद्र मोदी यांचा विक्रम मोडून ते भाजपाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे नेते झाले आहेत. आँगस्ट महिन्यात सिंह यांनी मुख्यमंत्री कार्यालयात सलग ५००० दिवस कामकाज करण्याचा पक्षांतर्गत विक्रम केला आहे. आदिवासींसाठी विविध योजना तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणार्या रमणसिहांना प्रस्थापितविरोधी जनभावनेच्या लाटेला तोंड द्यावे लागणार आहे.
भारतात ज्योती बसू यांनी सलग २३, नवीन पटनाईक यांनी १७, शीला दीक्षित यांनी १५, रमण सिंह यांनी १४, नरेंद्र मोदी यांनी १२.४ वर्षे असा कार्यकाळ मुख्यमंत्रीपदी राहून काम केले आहे. जयललिता आणि प्रकाशसिंह बादल यांनीही प्रत्येकी ११ वर्षांचा कार्यकाळ हे पद सांभाळले होते पण त्यात सलगता नव्हती.