नवी दिल्ली: नुकत्याच होऊन गेलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वेळ काँग्रेस आणि भाजपातील हाडवैरामुळे वाया गेला होता. भारतीय राजकारणात ही बाब काही नवीन नाही. मात्र, कर्नाटकात हेच पक्षीय वैर प्रेमीयुगुलाच्या भविष्यात अडथळा ठरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे संपूर्ण प्रकरण एखाद्या चित्रपटात शोभावे असेच आहे. या प्रेमीयुगुलातील मुलीचे वडील हे भाजपात असून माजी मंत्री होते, तर मुलाचे वडील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. एरवी दोन्ही पक्षांकडून सतत आम्ही धर्म किंवा जातपात मानत नाहीत, असा प्रचार केला जातो. मात्र, या प्रकरणात जात वेगळी असल्यामुळे या दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला विरोध केला आहे. या जोडप्यापैकी मुलगी ही पेशाने इंजिनियर आहे. माझे वडील दुसऱ्या मुलाशी लग्न करण्यासाठी माझ्यावर दबाव आणत होते, असे या मुलीने सांगितले. अखेर या दोघांनी पळून जाऊन गुलबर्गा येथे विवाह केला. त्यानंतर मुलीचे वडील आणि भावाकडून या दोघांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे या दोघांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग या दोघांचा खटला लढवत आहेत. न्यायालयाने या दोघांना कर्नाटकच्या अतिरिक्त महाधिवक्त्यांकडे बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. सुरक्षेच्या कारणास्तव या दोघांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. पुढील महिन्यात या प्रकरणाची सुनावणी होणे अपेक्षित आहे. मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीरदृष्या प्रौढ असलेल्या दोन व्यक्तींच्या लग्नात कोणीही अडथळा आणू शकत नाही, असा निकाल दिला होता.
भाजपा आणि काँग्रेस नेत्यांच्या मुलांची 'सैराट' प्रेमकहाणी; जात वेगळी असल्यामुळे लग्नाला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 4:03 PM