नवी दिल्ली - प्रेमासाठी लोक वाटेल ते करतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये समोर आली आहे. रशियातील मुलगी एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली आणि आता भारताची सून झाली आहे. या रशियन मुलीचं नाव आहे लीना बारकोलसेव्ह (Leena Barcolsev) आणि मुलाचं नाव आहे ऋषी वर्मा (Rishi Verma). दोघांनी नुकतंच कोर्ट मॅरेज केलं आहे. पीटर्सबर्गमध्ये दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर हळूहळू ओळख वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ऋषीने व्हि़डीओ कॉलवर तिला प्रपोज केलं होतं. सध्या मध्य प्रदेशमधील या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंदूरच्या सप्तश्रृंगी नगरमध्ये राहणारा ऋषी वर्मा हैदराबादमध्ये शेफ म्हणून काम करतो. दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये युरोप दौऱ्यावर (Europe Trip) गेला असताना ऋषीनं रशियात सेंट पीटर्सबर्गला भेट दिली. इथल्या प्रेक्षणीय स्थळाचे फोटो काढत असताना त्याची भेट लीना बारकोलसेव्होशी झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. ऋषीने लीनाला काही फोटो क्लिक करायला सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर ऋषी काही दिवसांनी भारतात परत आला; मात्र दोघांचा संपर्क तुटला नाही. दोघेही फोनवर बोलू लागले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
24 फेब्रुवारी रोजी कोर्ट मॅरेज केलं
काही काळाने ऋषीने व्हिडीओ कॉलवरच लीनाला प्रपोज केलं. लीनानेही त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि त्याला होकार दिला. कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे दोघेही बराच काळ एकमेकांना भेटू शकले नाहीत. अखेर डिसेंबर 2021मध्ये व्हिसा मिळाल्यानंतर लीना इंदूरला आली. ती भारतात आल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि कोर्ट मॅरेजसाठी अर्ज केला. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी नोंदणी पद्धतीने दोघांनी लग्न केलं. आता डिसेंबरमध्ये ते पुन्हा हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत.
लीना सध्या हिंदी भाषा शिकतेय
या वर्षाखेरीस आपण हिंदू रितीरिवाजानुसार विवाह करणार असल्याचं या दोघांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. लीनाने तिला भारतीय खाद्यपदार्थ आणि भारतीय संस्कृतीही खूप आवडत असल्याचं सांगितलं. स्वतः शेफ असल्यानं ऋषी लीनाला विविध प्रकारचे भारतीय खाद्यपदार्थ खायला देतो. लीना देखील आता हळूहळू भारतीय पदार्थ बनवण्यास शिकली आहे. दोघंही मंदिरात जातात. लीना सध्या हिंदी भाषा शिकत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.