शीलेश शर्मानवी दिल्ली : खूप प्रयत्न करूनही काँग्रेस गुजरातेत सत्ता मिळवू शकली नाही व २२ वर्षांनंतर सत्ताधा-यांविरोधात राग असूनही भाजपाला हे राज्य गमवावे लागलेले नाही. मात्र, संघर्ष केला, तर काँग्रेस भाजपाला दमवू शकतो, हे या निकालाने दाखविले.गुजरातेत काँग्रेसने अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानी व हार्दिक पटेल यांच्याशी मैत्री करून, स्वत: ८० जागा मिळविल्या व सहयोगी पक्षांना तीन. भाजपाला तीन आकडे गाठता आले नाहीत. संघर्ष केला, तर काँग्रेसला सत्ता मिळू शकते, हेच या निकालांनी दाखविले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक व पूर्वोत्तर राज्यांत हे यश काँग्रेसला संजीवनी देऊ शकते. मोदींशी लढण्यासाठी काँग्रेसला खालपासून वरपर्यंत संघटनेला सक्रिय करावे लागेल.ख-याचे खोटे व खोट्याचे खरे करण्याची शक्ती मोदींमध्ये आहे. या गुणांपासून राहुल खूप दूर आहेत. मोदी व शाह यांना आतापासूनच निवडणुका होणा-या राज्यांत व २०१९ साठी लक्ष घालावे लागेल. छोटीशी चूकही मोठा धक्का ठरू शकते. गुजरातमध्ये जो जोर राहुल गांधी यांनी दाखविला, तो पुढेही कायम राखावा लागेल.काँग्रेस अनेक छोट्या पक्षांना आपल्यासोबत घेऊ शकला नाही. द्रमुक, मायावतींचा बसप, ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस अशांना काँग्रेस बरोबर घेऊ शकला, तर गुजरातमधील नुकसान २०१९ मध्ये भरून काढले जाण्याची शक्यता आहे.दोघांची टक्केवारी वाढली-भाजपाला २०१२ मध्ये ४७.८५ टक्के मते होती, ती यंदा ४९.१० टक्के झाली.काँग्रेसला २०१२ मध्ये ३८.९३ टक्के मते मिळाली होती, ती आता ४१.५ टक्के झाली.
खरी परीक्षा पुढील वर्षी; काँग्रेसने संघर्ष केल्यास भाजपाची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 1:21 AM