जम्मूमधील रियासी परिसरात दहशतवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला. यात्रेकरूंना घेऊन जात असलेल्या बसला लक्ष्य करून करण्यात हा हल्ला घडवून आणण्यात आला. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केल्यानंतर बस दरीत कोसळली. त्यात ९ यात्रेकरूंचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले होते.
दरम्यान, हा हल्ला होण्यापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात रविवारी सायंकाळी ही बस कटराच्या दिशेने जाताना दिसत आहे. मात्र काही वेळातच या बसवर हल्ला होतो. तसेच दहशतवादी बसवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात करतात. यादरम्यान बसचा चालक प्रसंगावधान दाखवून ही बस घटनास्थळापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. मात्र यादरम्यान त्यालाही गोळी लागली.त्यामुळे बसवरील त्याचं नियंत्रण सुटून ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत जाऊन कोसळली. मात्र ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. तसेच त्यापैकी अनेकजण केवळ किरकोळ जखमी झाले. ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवलं नसतं तर मोठा नरसंहार घडला असता. दरम्यान, या हल्ल्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. लष्कराच्या गणवेशासारखे कपडे घातलेल्या दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला. त्यानंतर जवळच्या जंगलात जाऊन लपले. दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याची दखल घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच पीडितांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.