मुंबई- १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील महिलांची पावलं शिक्षणाकडे वळू लागली. विशेषत: तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये इंग्रजी शिक्षण आणि महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांमुळे मुलींसाठी शाळा तयार झाल्या. पुण्यामध्ये हुुजुरपागेसारखी महत्त्वाची संस्था निर्माण झाली. हुजुरपागेतून शिक्षण घेणाऱ्या शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या महिलांमध्य बेने इस्रायली समुदायाच्या रिबेका रुबेन (नौगांवकर) यांचं स्थान अत्यंत वरचं आहे. आजवर त्यांच्या कार्याची म्हणावी तशी दखल भारतीय माध्यमं किंवा शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांमध्ये घेतली गेली नाही. आज महिला दिनाच्या निमित्ताने रिबेका यांच्या कार्याची ओळख करुन घेण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. रिबेका रुबेन यांचा जन्म एजरा आणि सारा रुबेन नौगांवकर यांच्या पोटी १८ सप्टेंबर १८८९ रोजी झाला. त्यांच्या आईचे वडिल तत्कालीन म्हैसूर प्रांतातील (आजचा कर्नाटक) शिमोगा येथे राहात असल्यामुळे रिबेका यांचा जन्म त्यांच्या आजोळीच झाला. आठव्या वर्षी पुण्यातील हुजुरपागा शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. हुजुरपागेत त्यांनी मराठी, इंग्लिश आणि संस्कृतचा अभ्यास केला. हायस्कूलच्या शेवटच्या वर्षी त्यांनी संस्कृतच्याऐवजी हिब्रू शिकण्याचा निर्णय घेतला. सुटीच्या दिवसात थोडेफार वडिलांकडून हिब्रूची शिकवणी घेत आणि स्वयंशिक्षणाच्या मदतीने त्यांनी हिब्रूचे ज्ञान घेतले. १९०५ साली त्या मॅट्रिक झाल्या. त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून इतिहासात पदवी संपादन केली आणि वर्षभरासाठी त्यांनी हुजुरपागेत अध्यापन केले. १९११ साली त्यांनी लंडनमधील मारिया ग्रे ट्रेनिंग कॉलेजमध्ये टीचर्स डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी हिब्रू भाषेचे शिक्षणही घेतले. तेथे त्यांनी बेने इस्रायली समुदायावर शोधनिबंधही वाचला.शिक्षण पूर्ण झाल्यावर रिबेका पुन्हा हुजुरपागेत अध्यापनाचं काम करु लागल्या. हुजुरपागेत बेने इस्रायली मुलींसाठी त्यांनी हिब्रूचेही वर्ग चालवले. हुजुरपागेनंतर त्या बडोद्याच्या वुमेन्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून त्या काम करु लागल्या. १९२२ साली सर एली कदूरी स्कूल येथे त्या प्राचार्य पदावरती रुजू झाल्या. त्यानंतर १९५० पर्यंत त्या याच शाळेच्या सेवेत होत्या.१८७५ साली मराठी भाषिक बेने इस्रायली (ज्यू) समुदायामधील मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी हाईम सॅम्युएल केहिमकर (केहिमकर बाबा) यांनी या शाळेची डोंगरी येथे इस्रायली स्कूल नावाने स्थापना केली होती. सुरुवातीच्या काळामध्ये केवळ मुलींसाठी सुरू झालेल्या या शाळेमध्ये काही कालावधीनंतर ज्यू मुलांनाही प्रवेश देण्यात आला. त्यानंतर इतर धर्मींयांची मुलेही शाळेमध्ये येऊ लागली. १९३५ साली प्रसिद्ध ज्यू व्यापारी सर एली कदुरी भारताच्या भेटीवर आले असता त्यांनी या शाळेलाही भेट दिली. ज्यू मुलांच्या शिक्षणासाठी चाललेले काम पाहून ते भारावून गेले आणि शाळेला मोठी रक्कम त्यांनी देणगी म्हणून दिली. त्याच कृतज्ञतेपोटी शाळेचे नामांतर सर एली कदुरी स्कूल असे करण्यात आले.
(इस्रायलभेटीमध्ये एका तरुण विद्यार्थीनीशी चर्चा करताना रिबेका रुबेन)
माझगावातील या शाळेत विद्यार्थी यावेत यासाठी रिबेका यांनी विशेष प्रयत्न केले. शाळेच्या इमारतीसाठी निधी गोळा करण्यासाठी त्यांनी अक्षरश: दारोदार फिरुन पैसे उभे केले. डॉ. के. जी. सैयदिन यांच्याशी रेडिओवर १९५२ साली गप्पा मारताना त्यांनी भारतीय शिक्षणामध्ये इंग्रजीच्या स्थितीबद्दल आपले मत व्यक्त केले.
१९४८ साली एसएससी अॅक्ट लागू झाल्यावर इंग्रजीचे शिक्षण आठवीऐवजी पाचवीपासून देण्यास सुरुवात झाली. मध्यमवर्गियांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळामध्ये घालण्यासाठी धाव घेतली. रिबेका यांनी सर्व स्तरातील गरिब मुलांनाही शिक्षण घेता यावे तसेच यासाठी सर्वांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात यासाठी प्रादेशिक भाषेतील शिक्षणाला वगळून चालणार नाही असे मत मांडले होते. अर्थात इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व त्यांना मान्य होतेच. एकेवर्षी तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बी. जी. खेर एली कदूरी शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळेस खेर यांनी रिबेका यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. रिबेका रुबेन जर विधिमंडळात असत्या तर त्या नक्कीच शिक्षणमंत्री झाल्या असत्या, अशा शब्दांमध्ये त्यांनी रिबेका यांच्या कार्याचे महत्त्व सर्वांसमोर मांडले. समाजातील सर्व स्तरांतील मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी त्या धडपडत राहिल्या. १९५७ साली रिबेका रुबेन यांचे निधन झाले.
(विजयालक्ष्मी पंडित यांच्याबरोबर रिबेका रुबेन आणि इतर शिक्षणतज्ज्ञ. सर्व फोटो तेल अविव येथिल दांडेकर कुटुंबाच्या खासगी संग्रहालयातून)