नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील बहुमतातील काँग्रेसचे सरकार पाडणारे २२ आमदारांनी आज अत्यंत साध्या कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश केला. कोरोनाचे सावट या मोठ्या घटनेवर असल्याचे दिसून आले.
ज्योतिरादित्य शिंदेंनी नाराजीमुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी करत भाजपामध्ये प्रवेश केला होता. यावेळी १९ समर्थक आमदारांना त्यांनी बंगळुरूमध्ये ठेवले होते. यामध्ये आणखी तीन जणांची भर पडली होती. दरम्यान, एका आमदाराच्या मुलीने आत्महत्या केल्याने त्यांना राजस्थानला पाठविण्यात आले होते.
मध्य प्रदेश विधानसभाध्यक्षांनी या आमदारांचे राजीनामे मंजूर केल्याने कमलनाथ सरकार पडले. कमलनाथांनी कालच राजीनामा राज्यापालांकडे सोपवत बहुमत चाचणी टाळली होती. यामुळे आज बंडखोर आमदारांनी दिल्ली गाठत भाजपमध्ये प्रवेश केला.
हा पक्ष प्रवेश भाजपाच्या मुख्यालयात न घेता भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी घरासमोरील लॉनमध्ये गोलाकार आकारामध्ये खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे देखील उपस्थित होते. मध्य प्रदेशमध्ये आता २५ जागांवर पोट निवडणूक घेतली जाईल. ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितले की, या सर्व आमदारांना पुन्हा पोटनिवडणुकीचे तिकिट देण्यात येणार आहे. प्रत्येक आमदाराचा पक्षात सन्मान करण्यात येईल असे आश्वासन नड्डा यांनी दिले दिल्याचे म्हटले.