सुरेश डुग्गर / श्रीनगरजम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत २५० मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्तानी विशेष दलाच्या जवानांनी सोमवारी केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन भारतीय जवान शहीद झाले. पाकिस्तानी जवानांनी या जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, या अमानुष कृत्याला चोख उत्तर देण्याचा इशारा भारताने दिला आहे. लष्कराला त्यासाठी सर्वाधिकार देण्यात आल्याचे वृत्त आहे.पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. कमार जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषेजवळील काही भागाला भेट दिल्यानंतर विशेष दलाचा समावेश असलेल्या सीमा कृती दलाने (बीएटी) हा हल्ला केला. निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान पूंछ जिल्ह्याच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील बीएसएफच्या चौकीवर पाकिस्तानी चौकीवरील सैनिकांनी अग्निबाण आणि स्वयंचलित शस्त्रांनी तुफान गोळीबार केला. या हल्ल्यात लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंग आणि बीएसएफच्या २००व्या तुकडीचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर शहीद झाले तर राजेंद्रसिंग नामक जवान जखमी झाला. पाकच्या जवानांनी नंतर भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली. त्यामुळे शहीद जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते. या हल्ल्यानंतर भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत हे सोमवारी काश्मीरमध्ये होते. त्यांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरपरिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पुढील रणनीतीची चर्चा केल्याचे समजते. जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणे ही अमानुषता असून, भारतीय सशस्त्र दल या अमानुष कृत्याला चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिला. तर भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत तोफगोळ्यांचा मारा करीत प्रत्युत्तर दिले. योग्यवेळी योग्य ठिकाणी या हल्ल्याचा सूड घेतला जाईल, असे नॉदर्न कमांडने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
महिन्यात सात घटना पाकिस्तानी सैन्याने पूंछ आणि राजौरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर गेल्या महिनाभरात सात वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. १९ एप्रिलला पूंछमध्ये १७ एप्रिलला नौशेराच्या चौक्यांवर तोफांचा मारा केला होता. याशिवाय भीमभर गली सेक्टर, बालाकोटे आणि (दिगवार) पूंछमध्येही गोळीबार केला होता.पाक जवान, अतिरेक्यांकडून गोळीबारपाकिस्तानने आधी रॉकेट आणि शस्त्रांनिशी हल्ला केला. बॅट आणि अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केल्यानंतर दोन शहीद जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली. अतिरेकी घुसखोरी करतात त्या वेळी बॅटकडून मोठा हल्ला केला जातो. पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांनी भेट दिलेल्या स्थळापासून ३० किमी अंतरावर ही घटना घडली. गेल्या वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती...गेल्या वर्षी २८ आॅक्टोबर रोजी पाकिस्तानी सैनिकांनी मनदीप सिंग या भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली होती. मच्छेल सेक्टरमध्ये अतिरेक्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यात मनदीप सिंग शहीद झाले होते. जून २००८मध्ये गोरखा रायफल्सच्या एका जवानाला पकडण्यात आल्यानंतर त्याचे शीर कापून फेकण्यात आले होते. २०१३मध्ये लान्सनायक हेमराज आणि सुधाकर सिंग या दोन जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आली होती. कारगील युद्धाच्या वेळी कॅप्टन सौरभ कालिया यांचा मृतदेह विद्रूप केला होता.काश्मिरात विद्यार्थी व सुरक्षा दलात संघर्षदक्षिण काश्मीरच्या पुलवामामध्ये एका महाविद्यालयात सुरक्षा दलाच्या कारवाईविरुद्ध मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांची जवानांसोबत चकमक उडाली. सुरक्षा दलाने १५ एप्रिलला केलेल्या कारवाईच्या विरोधात ‘बॉईज हायर सेकंडरी स्कूल’ आणि पुलवामा डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हा संयुक्त मोर्चा काढला होता. हा मोर्चा पुलवामा पोलीस ठाण्याजवळ पोहोचताच काही विद्यार्थ्यांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक सुरू केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना पांगविण्याकरिता अश्रुधूर सोडला. बराच वेळ संघर्ष सुरूहोता; मात्र कुठल्याही जीवितहानीचे वृत्त नाही. काही विद्यार्थी कॉलेज इमारतीवर इसिसचा झेंडा आणि हिजबुल मुजाहिदिनचा मृत दहशतवादी बुरहान वाणी याचे पोस्टर घेऊन असल्याचे वृत्त असून त्यास दुजोरा मिळालेला नाही. संघर्ष चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. बँकेच्या कॅशव्हॅनवर हल्ला, ५ पोलिसांसह ७ ठारजम्मू-काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनवर कुलगामजवळ अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन बँक कर्मचारी व पाच पोलीस असे सात जण ठार झाले. अतिरेक्यांनी ५० लाख रुपये आणि शस्त्रे घेऊन पळ काढला. या हल्ल्याची जबाबदारी ह्यहिजबुल मुजाहिदीनह्णने स्वीकारली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर दगडफेक केली जात असताना अतिरेकी घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी कॅश व्हॅनवरील हल्ल्याच्या निमित्ताने पोलीस दलाला लक्ष्य बनविण्याची घटना घडली. दरम्यान, अतिरेक्यांना पकडण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलाने शोधमोहीम चालविली आहे. तत्पूर्वी रविवारी श्रीनगरच्या खानयार पोलीस ठाण्यावर हल्लेखोरांनी ग्रेनेडचा मारा केला. त्यात चार पोलीस जखमी झाले; तर एका नागरिकाचा मृत्यू झाला.