हरयाणात बंडखोरांनी वाढविली भाजप, काँग्रेसची काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 01:24 AM2019-10-06T01:24:56+5:302019-10-06T01:25:08+5:30
हरयाणात विधानसभा निवडणुकीत सतारूढ भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी बंडखोर डोकेदुखी ठरत आहेत. अनेक बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राज्यात २१ रोजी मतदान होणार आहे.
चंदीगड : हरयाणात विधानसभा निवडणुकीत सतारूढ भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी बंडखोर डोकेदुखी ठरत आहेत. अनेक बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राज्यात २१ रोजी मतदान होणार आहे.
रेवाडीतील भाजपचे विद्यमान आमदार रणधीर कापडीवास यांनी सांगितले की, आपण अपक्ष निवडणूक लढविणार आहोत. गुडगावचे भाजप आमदार उमेश अग्रवाल यांनी पत्नी अनिता यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरविले आहे. देवीलाल यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे नेते रणजित सिंह चौटाला तिकीट न मिळाल्याने रानियामधून अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. काही मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी बंडखोर थेट निवडणुकीत उतरले नाहीत; पण त्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडाचे निशाण फडकाविले आहे. भाजपने कापडीवास यांच्याविरुद्ध सुनील मुसेपूर यांना तिकीट दिले आहे. आपण निवडणूक का लढवीत आहात? असे विचारले असता कापडीवास म्हणाले की, मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे; पण मला कोणत्या गोष्टीची किंमत चुकवावी लागत आहे ते माहीत नाही. या मतदारसंघात एका बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले तेव्हा समर्थकांनी मला आग्रह केला की, आपण निवडणूक लढायला पाहिजे. भाजपने विद्यमान ४८ आमदारांपैकी १२ जणांना उमेदवारी नाकारली आहे. भाजप आणि काँग्रेसशिवाय इंडियन नॅशनल लोकदल, शिरोमणी अकाली दल, जननायक जनता पाटी, बहुजन समाज पाटी, आम आदमी पाटी, स्वराज इंडिया निवडणूक मैदानात आहेत.
अशोक तंवर यांचा राजीनामा
काँग्रेसच्या गोटातही अंतर्गत कलह आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अशोक तंवर यांनी हरयाणातील तिकीट वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तंवर यांनी शनिवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर तंवर यांना हटवून पक्षाने कुमारी शैलजा यांना पक्षाच्या राज्य शाखेचे प्रमुख बनविले होते.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविलेल्या राजीनाम्यात तंवर यांनी म्हटले आहे की, पक्षाला संपविण्याचा कट केला जात आहे. एका वृत्तसंस्थेला बोलताना ते म्हणाले की, आपल्यासमोर पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता.