लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सत्ताधारी पक्षांना बंडखोरीची भीती सतावत आहे. राजस्थानात भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची मर्जी राखण्याचे, तर काँग्रेससमोर सचिन पायलट यांना सांभाळण्याचे आव्हान हाेते. सध्या तरी दाेन्ही पक्षांनी बंडखोरी हाेऊ नये, याची काळजी घेतल्याचे दिसत आहे. पण, उमेदवार यादी जाहीर हाेताच मध्य प्रदेशात दाेन्ही पक्षांमध्ये राडा झाला.
मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमोरच कायकर्त्यांनी आंदोलन केले. तर, प्रदेश काॅंग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी पोस्टर्स आणि नावाच्या पाट्यांची तोडफाेड केली.
भाजपच्या दुसऱ्या यादीवर राजेंचेच वर्चस्व
भाजपने जाहीर केलेल्या ८३ जणांच्या यादीत वसुंधरा राजे यांचे वर्चस्व दिसून आले. कालीचरण सराफ, प्रताप सिंघवी, कैलाश वर्मा, सिद्धी कुमारी, कालुराम मेघवाल यांच्यासह ३० पेक्षा जास्त समर्थकांना तिकीट देण्यात आले आहे.
जोरदार विरोध
भाजप आणि काँग्रेसने मध्य प्रदेशात आयारामांना तिकीट दिल्यामुळे दाेन्ही पक्षांतील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जबलपूर मध्य येथून भाजपने माजी प्रदेशाध्यक्ष अभिलाष पांडे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांना स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे. भूपेंद्र यादव यांच्यासमोरच जोरदार निदर्शने करण्यात आली.
राजस्थानात तूर्तास बंड टळले
भाजपने दुसऱ्या यादीत ८३, तर काँग्रेसने ३३ उमेदवारांची घोषणा केली. भाजपने यापूर्वी ४१ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. भाजपने माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांना झालरापाटण मतदारसंघातून उमेदवारी दिली. पहिल्या यादीत राजे यांना डावलण्यात आले हाेते. त्यामुळे त्या स्वत: बंडखोरी करू शकतात, असे चित्र राजस्थानमध्ये निर्माण झाले हाेते. मात्र, भाजपने त्यांची बंडखोरी रोखण्यात यश मिळविल्याचे सध्यातरी दिसत आहे.