सोनिया गांधींविरोधात बंड करणाऱ्यांचे कापले तिकीट; धारीवाल, राठाेड व जाेशींना उमेदवारी नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 05:50 AM2023-10-19T05:50:22+5:302023-10-19T05:50:42+5:30
भारत जोडो यात्रेदरम्यान अनेकांनी तक्रारी केल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
- आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसने बंडखोरांना तिकिटे नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत बुधवारी चर्चा झाली. कॅबिनेट मंत्री शांती धारीवाल, महेश जोशी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय धर्मेंद्र राठोड यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांना निरीक्षक म्हणून जयपूरला पाठवले होते. त्या बंडात या तिघांनी महत्त्वाची भूमिका बजावली हाेती. धारीवाल यांनी म्हटले होते की, कोण काँग्रेस नेतृत्व? आज काँग्रेस नेतृत्व आपल्या अस्तित्वाची प्रचीती देत आहे.
...म्हणून दिला डच्चू
सोनिया गांधी यांनी धारीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का, असे विचारले हाेते. भारत जोडो यात्रेदरम्यान अनेकांनी तक्रारी केल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
तिकीट कापले, बंडखाेर वाढले
भाेपाळ : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून आता उमेदवारांच्या याद्या जाहीर हाेण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख लढत भाजप आणि काॅंग्रेस यांच्यातच असून दाेन्ही पक्षांच्या याद्या जाहीर हाेताच बंडखाेरीही सुरू झाली आहे. विंध्य भागात नाराज झालेल्यांनी पक्षाला रामराम करून इतर पक्षांची वाट धरली आहे.
रिवा जिल्ह्यातून काॅंग्रेसचे दावेदार बृजभूषण शुक्ल यांनी राजीनामा दिला. दुसरीकडे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर चतुर्वेदी यांनीही बसपामध्ये प्रवेश केला. नागाैद येथून दावा करणाऱ्या नगराध्यक्ष प्रतिभा सिंह यांनीही काॅंग्रेसचा हात साेडला.