विजयवाडा : विजयवाडा शहराच्या वन टाऊन भागात रस्ता रुंदीकरण आणि सुशोभिकरणासाठी पाच मंदिरे पाडली गेल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये उसळलेला संताप व या घटनेला आलेला गडद राजकीय रंग लक्षात घेऊन चंद्राबाबू नायडु यांच्या तेलगु देसमच्या सरकारला ही सर्व मंदिरे त्याच जागी पुन्हा बांधून देण्याची घोषणा करावी लागली आहे.शहरात चातुर्मासानिमित्त ‘कृष्ण पुष्करम’ नावाचा मोठा उत्सव भरतो व त्यावेळी लाखो भाविकांची गर्दी लोटते. उत्सवाचे नियोजन सुलभ व्हावे यासाठी शहर प्रशासनाने त्या भागातील रस्ते रुंद करण्याची व सुशोभिकरणाची योजना हाती घेतली आहे. या कामाचा भाग म्हणून प्रसिद्ध विनायक मंदिर, कनकदुर्गानगर भागातील ऐतिहासिक विजयेश्वर स्वामी मंदिर, सीताम्मावरी पडालु, शनिश्वर मंदिर व दक्षिणमुखी अंजनेय मंदिरासह आणखी दोन मंदिरे पाडली गेली.या पाडकामावरून श्रद्धाळु नागरिकांमध्ये संताप उसळला व ते रस्त्यावर आले. भाजपा व तेलगु देसमने यास आपापले राजकीय रंग दिल्याने परिस्थिती आणखी चिघळली. ‘कृष्ण पुष्करम’च्या आयोजनात कोणतीही हिंदू धर्मार्थ संस्था सहभागी होणार नाही, असे हिंदु धर्म परिरक्षण समितीने जाहीर केले.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने पाच मंत्र्यांची एक समिती नेमली. पाडलेली ही सर्व मंदिरे त्याच ठिकाणी पण वाहतुकीस अडथळा येणार नाही अशी अधिक चांगल्या प्रकारे पुन्हा बांधून दिली जातील, असे धर्मादाय व्यवहारमंत्री पी. मणिकल्या राव यांनी समितीचया वतीने जाहीर केले. ही कारवाई करण्याआधी लोकांना पूर्वसूचना देऊन विशवासता घ्यायला हवे होते, असे म्हणून मंत्री समितीने अधिकाऱ्यांच्या डोक्यावर खापर फोडले.
रस्ता रुंदीकरणात पाडलेली सर्व मंदिरे पुन्हा बांधून देणार
By admin | Published: July 05, 2016 4:22 AM