नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रींग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, वडील पी. चिदंबरम गुरुवारी 11 वाजता संसदेत उपस्थित राहणार आहेत.
न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन देताना काही अटी घातल्या आहेत. यानुसार ते संमतीशिवाय बाहेर देशात प्रवास करू शकणार नाहीत. तसेच चौकशीसाठी जेव्हा बोलविण्यात येईल, तेव्हा उपस्थित राहावे. यासह माध्यमांमध्ये काहीही प्रतिक्रिया देण्यासाठी न्यायालयाने त्यांना मज्जाव केला आहे.
कार्ती चिदंबरम म्हणाले की, वडिलांना जामीन मिळाला याची आनंद आहे. त्यांच्यासोबत सुडाचे राजकारण करण्यात येत असून सरकारवर टीका केल्यामुळे हे सगळ झालं. 2007 मधील प्रकरणाची चौकशी 2017 मध्ये सुरू करण्यात आली आहे. भाजपला जे म्हणायचं ते म्हणून द्या आम्ही त्याना न्यायालयात उत्तर देऊ. उद्या वडील संसदेत उपस्थित राहणार असून पहिल्याप्रमाणेच आपले मुद्दे मांडतील. या संदर्भात आपलं त्यांच्याशी बोलणं झाल्याचं कार्ती यांनी नमूद केले.
पी. चिदंबरम तामिळनाडू येथून राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांना न्यायालयाने जामीन दिला असली तरी त्यांचा पासपोर्ट न्यायालयात जमा असून बाहेर देशात जाऊ नये यासाठी न्यायालयाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.