बंगळुरू, दि. 8- मुलगा आणि सून घटस्फोटानंतर वेगळे झाल्यावर आपल्या मुलाकडून सुनेला 4 कोटींची पोटगी मिळवून देण्यासाठी एकाने सासूने तिच्या सुनेला मदत केली आहे. घटस्फोटानंतर सुनेला तिचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करता यावा त्यासाठी या महिलेने तिच्या सुनेला पाठिंबा दिला. कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणी देवानंद शिवशंकरप्पा काशप्पनावर यांना 60 दिवसांच्या आतमध्ये त्यांच्या पत्नीला 4 कोटी रूपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. देवानंद शिवशंकरप्पा कर्नाटकचे माजी दिवंगत मंत्री एस.एस. काशप्पनावर यांचा मुलगा आहे.
कौटुंबिक न्यायालयाने 24 जुलै रोजी हा निर्णय दिला. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे कोर्टात देवानंद यांच्या आईने सुनेच्या बाजूने साक्ष दिली. या प्रकरणातील सुनेने 2015मध्ये पतीपासून वेगळं होण्यासाठी आणि 4.85 कोटी रूपये पोटगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती. या मागणीला कोर्टाने मंजुरी दिली आहे. हे दोघं पती-पत्नी 2012 पासून वेगळे राहत असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं. या दरम्यान ते कधीही एकमेकांना भेटले नाहीत. तसंच या काळात त्या महिलेने तिच्या पतीकडे परत जाण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
हिंदू मॅरेज अॅक्ट 1955 नुसार जर घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्यानतंर दोन वर्ष जर पती-पत्नी एकत्र राहिले नाहीत याचिकाकर्ती व्यक्ती घटस्फोटासाठी पात्र असते. याप्रकरणी कोर्टाने देवानंद यांच्या आईचीही साक्ष नोंदवू घेतली. त्यांनी कोर्टात सांगितलं, जेव्हा त्यांच्या मुलाने याचिकाकर्त्या महिलेशी लग्न केलं होतं त्याच्या आधीही त्यांचं एक लग्न झालं असून त्यांना एक मुलगा आहे. देवानंद यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन दुसरं लग्न केलं आणि लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या पूर्ण न करता दुसऱ्या पत्नीला सोडून दिलं. देवानंद यांच्याकडे बऱ्याच जमीनी, आलिशान गाड्या आणि भरपूर पैसे असल्याचं, देवानंद यांच्या आईने कोर्टात सांगितलं. कोर्टाने नोटीस पाठवूनही देवानंद सुनावणीसाठी कोर्टात हजर झाले नव्हते. याचिकाकर्त्या जेव्हा बीबीएचं शिक्षण घेत होत्या तेव्हा त्या दोघांनी लग्न केलं होतं. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर काही आठवड्यातच देवानंद यांच्या वागण्यात बदल झाला. एका अनोळखी व्यक्तीप्रमाणे ते वागणुक द्यायला लागले. त्यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत असल्याचं, या महिलेने सांगितलं आहे.