नवी दिल्ली : लॉकडाऊन अथवा सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही, तर एक कोरोना बाधित व्यक्ती 30 दिवसांत 406 जणांना कोरोना बाधित करतो, असे आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आले आहे. मात्र, आपण लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन केले तर एक व्यक्ती केवळ 2.5 लोकांनाच संक्रमित करू शकतो, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनसंदर्भात आरोग्य आणि गृह मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
देशात आतापर्यंत 4,421 जमांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर सोमवारपासून ते आतापर्यंत 354 नव्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 326 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. तसेच अद्याप लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कसल्याही प्रकारचे अंदाज बांधू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
2,500 डब्ब्यांमध्ये 40 हजार आयसोलेशन बेड -
अग्रवाल म्हमणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने 2,500 डब्ब्यांमध्ये तब्बल 40,000 आयसोलेशन बेड तयार केले आहेत. ते रोज 375 आयसोलेशन बेड तयार करत आहेत. देशातील 133 ठिकाणी हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सरकार समूह नियंत्रण आणि प्रशासनास उत्तरदाई आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एका विशेष रणनीतीवर काम करत आहे. ही रणनीती मुख्यतः आगरा, गौतम बुद्ध नगर, पथानमथिट्टा, भीलवाडा आणि पूर्व दिल्लीमध्ये सकारात्मक सिद्ध होत आहे.
देशात आतापर्यंत 1,07,006 टेस्ट -भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) रमन गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाच्या 1,07,006 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सध्या 136 सरकारी प्रयोगशाळांमध्ये काम सुरू आहे. तसेच 59 खासगी प्रयोगशाळांनाही कोरोना टेस्टची परवानगी देण्यात आली आहे.
देशातील आवश्यक वस्तू आणि सेवा समाधान कारक -यावेळी बोलताना गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाल्या, आवश्यक वस्तू आणि सेवा समाधानकारक आहेत. गृह मंत्रालयाने आवश्यक वस्तूंची आणि लॉकडाऊनमधील उपायांसंदर्भात सविस्तर समीक्षा केली आहे. तसेच साठेबाजी आणि काजाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.