ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - दिल्ली सरकारमधल्या आमदारांचे पगार एकदम चौपट वाढू शकतात असे दिसत आहे. आमदारांचे पगार किती असावेत यासाठी दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षांनी एक समिती नेमली होती. या समितीने आमदारांचे पगार चौपट करण्याची शिफारस केली असून जर ती मान्य झाली दिल्लीतल्या आमदारांची व त्यातही विशेषत: आम आदमी पार्टीच्या आमदारांची चांदी होणार आहे कारण विधानसभेच्या ७० आमदारांपैकी ६७ आमदार आपचे आहेत.
अध्यक्षांनी नेमलेल्या स्वतंत्र समितीने शिफारस केली आहे की आमदारांचा पगार १२ हजारांवरून ५० हजार करावा व त्यांना मिळणारा भत्ता ६ हजारांवरून वाढवून ३० हजार रुपये करावा.
जर एकूण सगळा पगार, भत्ता व कर्मचा-यांचा खर्च जमेस धरला तर सध्याच्या ८८ हजार रुपयांवरून ही रक्कम २.२० लाख रुपये होते. यापैकी ७० हजार रुपये कर्मचा-यांसाठी व बाकिचे आमदारांच्या पगार व अन्य भत्त्यांपोटी असतिल.
आम आदमी पार्टी ही सर्वसामान्य लोकांची पार्टी असं बिरूद मिरवते, परंतु त्यांचे खरे रंग आता दिसत असल्याची खोचक प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.
जर ही वाढ अमलात आली तर दिल्लीचे आमदार देशातील सर्वात जास्त पगार घेणारे आमदार छरणार आहेत.