नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या आमदार अलका लाम्बा यांच्या विरुद्ध असभ्य भाषेचा वापर केल्याच्या संदर्भात दिल्ली विधानसभेच्या वर्तणूक समितीने भाजपचे आमदार ओ. पी. शर्मा यांना सभागृहातून निलंबित करण्याची शिफारस केली आहे.दहासदस्यीय वर्तणूक समितीने शर्मा यांना सभागृहात नेहमीच नियमांचे उल्लंघन करीत असल्याबद्दल दोषी ठरवून विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांच्याकडे त्यांच्या निलंबनाची शिफारस केली. लाम्बा यांनी शर्मा यांना माफी मागण्याची संधीही दिली; पण शर्मा यांनी माफी मागितली नाही, असेही समितीने स्पष्ट केले आहे. पतियाळा हाऊस कोर्टात पत्रकार आणि विद्यार्थी यांना जी मारहाण करण्यात आली, त्यातही ओ. पी. शर्मा सहभागी झाले होते. त्यांना पोलिसांनी गुरुवारी अटकही केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)