शीलेश शर्मा - नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांंनी आपसातील मतभेद विसरावेत, असे सांगत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सिद्धू यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करण्याचा सल्ला मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना दिला आहे. त्यानंतर पंजाबचे प्रभारी आणि काँग्रेसचे सरचिटणीस हरिश रावत यांनी अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यातील मतभेद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या. (Reconciliation between Amarinder Singh and Navjot Sidhu)
काँग्रेस नेतृत्वाच्या या प्रयत्नांनंतर सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांनी गेल्या ४८ तासांत तीनदा चर्चा केली. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनीच सिद्धू यांच्याशी आता कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. सिद्धू हे लवकरच मंत्रिमंडळात परततील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या सूत्रांनुसार येत्या काही दिवसांत अमरिंदर सिंग हे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असून, सिद्धू यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याचे संकेत आहेत.