नवी दिल्ली : वारसा, संस्कृती, साहस आणि शक्ती यांचा अनोखा मिलाफ राजपथावर रविवारी पहायला मिळाला. ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित भव्य संचलनात देशाची ताकद संपूर्ण जगाला कळाली. अतिशय नयनरम्य अशा या सोहळ्याने सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फेडले. हजारो जणांच्या साक्षीने संपन्न झालेला हा सोहळा अभूतपूर्व असाच होता.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे ब्राझिलचे राष्ट्रपती जेर मेसिअस बोलसोनारो आदी यावेळी उपस्थित होते. यंदा प्रथा मोडित काढत पंतप्रधान मोदी यांनी इंडिया गेट येथील अमर जवान ज्योतीच्या ठिकाणी न जाता राष्ट्रीय युद्धस्मारकात जाऊन शहिदांना अभिवादन केले. ध्वजारोहणानंतर २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत होताच संचलनाला प्रारंभ झाला. लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही संरक्षण दलांनी त्यांच्या सामर्थ्याचे जोरदार प्रदर्शन यावेळी केले. पहिल्यांदाच अपाचे आणि चिनुक हे हेलिकॉप्टर, धनुष ही स्वदेशी बनावटीची तोफ यांचा संचलनात समावेश होता तर, राफेल या फ्रान्स बनावटीच्या लढाऊ विमानाची प्रतिकृती यावेळी ठेवण्यात आली होती.
यंदाच्या लष्करी परेडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांच्या या परेडचे नेतृत्व महिलेने केले. नागपूरमध्ये शिक्षण झालेल्या कॅप्टन तानिया शेरगीलला हा बहुमान मिळाला. राजपथावर एकूण ३८ चित्ररथ सहभागी झाले. त्यात २२ सांस्कृतिक चित्ररथ तर १६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांचा समावेश होता. यावेळी सहा मंत्रालयांच्या चित्ररथांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यंदा प्रथमच राजपथावर पंतप्रधानांसोबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या देशभरातील एकूण १०५ विद्यार्थ्यांनीही संचलन बघितले.
संचलनात पहिली तुकडी ६१ वी जवानांची घोडदळ तुकडी होती. १ आॅगस्ट १९५३ रोजी केवळ सहा तुकड्या मिळून जवानांचे घोडदळ सुरू करण्यात आले होते. जवानांचे घोडदळ असणारी ही जगभरातील एकमेव तुकडी आहे. कॅप्टन दिपांशू शेरॉन यांच्या नेतृत्वात एकमात्र घोडदळ जवानांचा ताफ्याने राजपथावर दमदार संचलन केले. घोड्यांच्या टापांनी राजपथ दणाणून उठला. डीआरडीओची उपग्रह भेदी ए सॅट ही प्रणाली प्रथमच संचलनात सहभागी झाली होती. उणे ४५ अंश सेल्सियस तापमानात सीमेचे रक्षण करणाऱ्या इंडो तिबेटियन सीमा पोलिसांच्या तुकडीने दमदार संचलन केले. त्यापाठोपाठ कुमाऊ रेजिमेंटच्या जवानांनीही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, एचडी देवेगौडा आदी मान्यवर उपस्थित होते.कॅप्टन तानियाने केले नेतृत्वनागपूरमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करणाºया आणि लष्करात जाण्यासाठीचे प्रशिक्षण नागपूरच्याच प्रहार संस्थेत घेणाºया कॅप्टन तानिया शेरगिल हिने पुरुषांच्या लष्करी तुकडीचे नेतृत्व केले. २६ वर्षीय तानिया चौथ्या पिढीतील सैन्य अधिकारी आहे. वडील, आजोबा आणि पणजोबा अशा तिघांनी सैन्यात सेवा केली आहे. पुुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी ती पहिली महिला ठरली आहे. पंजाबमधील होशियारपूरमध्ये सध्या त्या संदेश प्रणालीची कॅप्टन आहे.राष्ट्रीय युद्धस्मारकाला अभिवादनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षांची परंपरा यंदा मोडित काढली. इंडिया गेट येथील अमर जवान ज्योतीच्या ठिकाणी जाऊन पंतप्रधान अभिवादन करतात. त्यानंतर ते पथसंचलनाच्या ठिकाणी येतात. मात्र, यंदा मोदी हे इंडिया गेट जवळील राष्ट्रीय युद्धस्मारकात गेले. या स्मारकाचे गेल्या वर्षीच उद्घाटन करण्यात आले आहे. याठिकाणी मोदी यांनी शहिदांना अभिवादन केले.