हैदराबाद: हैदराबादमधील एका रुग्णालयानं काल एका रुग्णाच्या शरीरातून १५६ किडनी स्टोन्स काढले. ५० वर्षीय महिलेच्या किडनीमधून कीहोलच्या माध्यमातून स्टोन्स काढण्यात आले. देशात पहिल्यांदाच एका रुग्णाच्या शरीरातून एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात स्टोन्स काढण्यात आल्याचा दावा डॉक्टरांनी केला.
हुबळीमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेच्या किडनीमधून कोणत्याही मोठ्या सर्जरीशिवाय लॅप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपीच्या मदतीनं स्टोन्स काढल्याचा दावा हैदराबादच्या प्रिती युरोलॉजी एँड किडनी हॉस्पिटलनं केला आहे. रुग्ण महिला शाळेत शिक्षिका आहे. त्या हुबळीत राहतात. त्यांना अचानक वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी चाचणी करून घेतली. त्यातून किडनी स्टोनचं निदान झालं.
गेल्या २ वर्षांत महिलेच्या किडनीमध्ये स्टोन्स तयार झाले. मात्र गेल्या २ वर्षांत महिलेला कोणताही त्रास झाला नाही. अचानक महिलेला त्रास होऊ लागला. त्यानंतर महिलेनं चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल पाहून डॉक्टरांना धक्का बसला.
डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता लॅप्रोस्कॉपी आणि एंडोस्कॉपी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ३ तास लागले. डॉक्टरांनी एक साधारण कीहोल करून सर्व स्टोन्स बाहेर काढले. महिलेची स्थिती आता चांगली असून ती पूर्वीप्रमाणे काम करू लागली आहे.