नवी दिल्ली: देशात शुक्रवारी कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. सरकारनं सांगितल्यानुसार, आज भारतात 93 लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आल्या आहेत. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एका दिवसांत करण्यात आलेली ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, देशातील एकून लसीकरणाचा आकडा 62 कोटींच्या पुढे गेला आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
सलग दुसऱ्या दिवशी 40 हजारांहून अधिक रुग्ण
देशात कोरोना संसर्गाचा वेग मागील दोन दिवसांत काहीसा वाढला आहे. गेल्या 24 तासात, 44,543 नवीन संक्रमित रुग्ण आढळले. या दरम्यान, 32,920 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 493 रुग्णांचा मृत्यू झाला. या आकडेवारीनुसार अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत 11,125 ची वाढ झाली. सध्या देशभरात 3.38 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.