चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आजवरच्या सर्वांत मोठ्या वाणिज्य मोहिमेची उलटगणती सुरू केली आहे. १० जुलै रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा अंतराळ बंदरावरून पीएसएलव्ही- सी २८ हे अवकाशयान १,४४० किलो वजनाच्या पाच ब्रिटिश उपग्रहांसह अवकाशात झेप घेणार आहे.बुधवारी सकाळी ७.२८ वाजता या उपग्रहाच्या ६२.५ तासांच्या उलटगणतीला प्रारंभ झाला असून, ती सुरळीत पार पाडली जात असल्याचे इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल अर्थात पीएसएलव्ही शुक्रवारी रात्री ९.५८ वाजता श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून अवकाशाच्या दिशेने झेपावेल. पाच उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडण्याचे काम पीएसएलव्ही चोखपणे बजावेल. इस्रोच्या अँट्रिक्स या वाणिज्य शाखेने हाती घेतलेल्या या मोहिमेत आजवरचे सर्वाधिक वजन अवकाशात नेण्याची कामगिरी पीएलएलव्ही करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. मिशनचा आढावा घेणारी समिती आणि प्रक्षेपण मंजुरी मंडळाने काल पीएसएलव्हीच्या प्रक्षेपणाला हिरवी झेंडी दिली. (वृत्तसंस्था)
विक्रमी पीएसएलव्हीची उलटगणती सुरू
By admin | Published: July 08, 2015 11:38 PM