नवी दिल्ली : कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाचा प्रसार वाढत असून त्याचा परिणाम म्हणून सरलेल्या वर्षामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान (एज्यु टेक) क्षेत्रामध्ये दशकातील सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. गतवर्षामध्ये या क्षेत्रात २.१ अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक झाली आहे. कोरोनाकाळात देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे हिंडण्याफिरण्यावर आलेले निर्बंध यामुळे शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल घडून आले. ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढले, इंटरनेटचा वापर वाढला, ई-लर्निंगचे प्रमाण वाढले. या पार्श्वभूमीवर नुकत्याच सरलेल्या (सन २०२०) वर्षात शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तब्बल २.१ अब्ज डॉलर एवढी प्रचंड गुंतवणूक झाली. गेल्या दशकभरात या क्षेत्रात केवळ १.७ अब्ज डॉलर एवढीच गुंतवणूक झाली होती. या पार्श्वभूमीवर झालेली ही वाढ निश्चितच उल्लेखनीय म्हणावी लागेल. सन २०२५ पर्यंत या क्षेत्रामध्ये १२ अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
काय आहे एज्यु-टेक क्षेत्र .... शैक्षणिक तंत्रज्ञान अर्थात एज्यु-टेक क्षेत्रात गणिताच्या शिकवणीसाठी साध्या संगणकाच्या वापरापासून ते गृहपाठ ऑनलाइन सादर करण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांचा समावेश होतो. ऑनलाइन शिक्षणासाठी लॅपटॉपचा आणि मोबादलचा वापर हे या क्षेत्रातील पुढचे पाऊल आहे.