मुंबई : रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या कोट्यातून रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून रेल्वे भरतीतील उमेदवारांची तब्बल ९३ लाखांना फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आहे. उमेदवारांकडून नोकरीसाठीचा तगादा सुरू झाल्यानंतर यापैकी वैतागलेल्या एका ठगाने स्वत:ची यातून सुटका करण्यासाठी गोयल यांनाच मेल केला. यामुळे आपल्यावर संशय येणार नाही, असे त्याला वाटत होते. मात्र, याच मेलमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि भरती सुरू होण्यापूर्वीच या रॅकेटचा पर्दाफाश करण्यास एमआरए मार्ग पोलिसांना यश आले.
मंत्र्यांच्या कोट्यातून नोकरी देण्याचे आमिष, दिल्लीतील मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक
दिल्लीतील मनजीतसिंग चिलोत्रे हा यामागील मास्टरमाइंड आहे. तो विमा आणि गुंतवणूक दलाल म्हणून काम करतो. भारतीय रेल्वेच्या गट ‘क’ व ‘ड’ या पदाकरिता तसेच रेल्वे संरक्षण दलात २०१८ च्या भरतीसाठीची जाहिरात प्रकाशित झाली होती. ही भरती प्रक्रिया रेल्वे भरती मंडळातून तर संरक्षण दलाची भरती रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक यांच्या मार्फत घेण्यात येते. या भरतीसाठी लाखो उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज भरले होते. मनजीतने ओळखीच्याच दलालांना एकत्र केले. रेल्वे भरतीतील उमेदवारांनाच टार्गेट करायचे ठरविले. यासाठी सुरुवातीला पालघरचा दलाल रुफुस रमेश डांबरे (३८) याच्या मदतीने परिसरातील उमेदवारांना हेरले. त्यांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या कोट्यातून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी एकाकडून ५ ते ६ लाख रुपये उकळले. डांबरेने त्याच्याकडील ७ उमेदवारांकडून जवळपास ४५ लाख रुपये उकळले. नोकरीच्या आमिषाने उमेदवारही त्यांच्या जाळ्यात अडकले. जानेवारीपासून आतापर्यंत त्यांनी मुंबईसह राज्यभरातील उमेदवारांची तब्बल ९३ लाखांना फसवणूक केली. याच दरम्यान उमेदवारांनी डांबरेकडे नोकरीबाबत विचारपूस सुरू केली. प्रकरण अंगलट येत असल्याचे समजताच डांबरेने गोयल यांनाच मेल करून नोकरी कधी देणार, याबाबत विचारपूस सुरू केली. असे केल्याने आपल्यावर संशय येणार नाही असे त्याला वाटले.
दुसरीकडे, या मेलमुळे गोयलही गोंधळले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी खासगी सचिव प्रवीण गेडाम यांना थेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार, २० आॅगस्ट रोजी गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआरए मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यामध्ये चिलोत्रे, डांबरेसह संजीव चटर्जी, प्रदीप चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार, उपनिरीक्षक योगेश भोसले, स्वप्निल शिंदे यांनी तपास सुरू केला. पहिल्याच टप्प्यात गोयल यांना आलेल्या ई-मेलवरून डांबरेला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत चिलोत्रेचे नाव उघड झाले. गुरुवारी रात्री दिल्लीतून चिलोत्रेलाही अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. डांबरे आणि चिलोत्रेच्या चौकशीत अन्य ५ विमा दलालांची नावे समोर आली आहेत. त्यांचा शोध सुरू असून डांबरेचा या प्रकरणात नेमका सहभाग काय आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.