नवी दिल्ली - जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी जवानांकडून अलिकडच्या काळात सातत्याने गोळीबार केला जात आहे. दोन दिवसात भारताचे चार जवान शहीद झाले तर सहा नागरिकांचा मृत्यू झाला. सीमेवर प्रचंड तणाव वाढल्यामुळे परिसरातील 300 शाळा पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेजवळील सुमारे 20 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर अर्निया, रामगढ, संबा आणि हिरानगर भागात पहाटे पाचपर्यंत पाकचा मारा सुरू होता. दरम्यान, श्रीनगर येतील उत्तर कमानच्या सुत्रांनी हे वृत्त फेटळलं आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पाकिस्तानी सैन्याकडून रोजच शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार सुरू आहे, मात्र गेल्या तीन दिवसांपासून पाक सैन्यांनी जम्मू विभागातील पाच जिह्यांतील सीमेलगतच्या गावांना टार्गेट केले. गोळीबार, ग्रेनाईड आणि उखळी तोफांमधून हल्ले केले जात आहेत. शनिवारी सकाळी पूंछमधील कृष्णा घाटी क्षेत्राजवळ पाकने गोळीबार सुरू केला. सव्वाआठच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात लष्करी शिपाई मनदीप सिंग (23) जखमी झाले व उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याशिवाय जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील आर. एस. पुरा क्षेत्र व अब्दुलियन या भागात एक 17वर्षीय मुलगा व 45वर्षीय व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाला व सहा नागरिक जखमी झाले. तर जम्मूतील कनाचाक क्षेत्रात गजानसू बसस्थानकावर झालेल्या माऱ्यात जखमी झालेल्या दोघांपैकी 25वर्षीय तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे तीन दिवसांत पाकच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या भारतीयांची संख्या 10 झाली आहे, तर 50 जखमी झाले आहेत.
लष्कराच्या 100च्या वर गाड्या; अॅम्ब्युलन्स जम्मू, सांबा, पूंछ, कथुआ, राजौरी या जिल्हय़ांतील सीमेलगतची शेकडो गावे रिकामी केली आहेत. पाकडय़ांच्या हल्ल्यामुळे अनेकांच्या घरांचे, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या गावांमधील 10 हजारांवर नागरिकांना लष्कराने, बीएसएफने सुरक्षितस्थळी हालविले. नागरिकांना सुरक्षितस्थळी घेऊन जाण्यासाठी लष्कराने 100च्या वर वाहनांची सोय केली. जखमी नागरिकांना रुग्णालयात हलविण्यासाठी ऍम्ब्युलन्सही तयार ठेवण्यात आल्या.
8 पाकिस्तानी रेंजर्स ठार प्रत्युत्तराच्या कारवाईत भारतीय सेनेनं सांबा, आरएसपुरा आणि हीरानगर सेक्टर परिसरात पाकिस्तानचं प्रचंड नुकसान केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमारेषे पलिकडे शकरगड आणि सियालकोट परिसरात आठ पाकिस्तानी नागरिक आणि रेंजर्स मारले गेले आहेत.
150 दुभती जनावरे मृत्युमुखी आर. एस. पुरा सेक्टरमध्ये जोराफार्म हे लहानसे गाव उत्कृष्ट प्रतीच्या दुधासाठी प्रसिद्ध आहे. गुज्जर समाजाची शंभरावर घरे येथे असून दुधाचा व्यवसाय करतात. पाकच्या गोळीबारात येथे सर्व कौलारू घरांना आग लागली. घरे जळून खाक झाली. अनेक दुभती जनावरे होरपळली. 150 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानला धडा शिकवा, बीएसएफच्या महासंचालकांचा आदेशभारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील स्थिती तणावपूर्ण आहे. नियंत्रण रेषेलगत गोळीबार केल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या नागरी वस्त्या आणि भारतीय लष्कराच्या सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात शहीद झालेले जवान ए. सुरेश यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महासंचालक शर्मा म्हणाले की, बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तानी रेंजर्सनी झाडलेली एक गोळी सीमेवरील खंदकातील निमुळत्या खिंडारातून पार होत या जवानाला लागली. पाकिस्तानच्या बाजूनेच वारंवार भारतीय हद्दीत विनाकारण गोळीबार आणि उखळी तोफांचा भडिमार केला जातो. तथापि, आम्ही दरवेळी पलटवार करून या अगोचरपणाचा बदला घेत असतो, असे शर्मा म्हणाले.