नवी दिल्ली - कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जगभरातील नामांकित कंपन्यांनी अनेक लसी विकसित केल्या आहेत. मात्र भारतात कोरोनावरील विविध मार्गांनी उपचारांच्या बातम्या येत असतात. आता ओदिशा आणि छत्तीसगडमधील आदिवासी बहुल भागामध्ये खाण्यात येणारी लाल मुंग्यांची चटणी कोरोनाविरोधातील उपचारांमध्ये लवकरत वापरण्यात येण्याची शक्यता आहे. आयुष मंत्रालय लवकरच या चटणीला कोरोना विषाणूविरोधातील औषध म्हणून मान्यता देण्याची शक्यता आहे. याबाबत ओदिशा हायकोर्टाने आयुष मंत्रालयाला तीन महिन्यात चौकशी करून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ओदिशा हायकोर्टाने आयुष मंत्रालय आणि कौन्सिल ऑफ सँटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या महासंचालकांना याबाबत लवकरच निर्णय घेण्याची सूचना केली आहे. याबाबत तीन महिन्यात निर्णय घ्यावा, असे हायकोर्टाने म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी लोक लाल मुंग्यांचा वापर ताप, सर्दी-खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि अन्य आजारांवर इलाज म्हणून करतात.या लाल मुंग्यांच्या चटणीमध्ये लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्यांचा समावेश असतो. ओदिशा हायकोर्टाने या चटणीच्या औषधी उपयोगाबाबतचा आदेश एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिला आहे. या जनहित याचिकेमध्ये लाल चटणीच्या औषधी प्रभावाबाबत माहिती घेण्यासाठी काहीच पावले उचलण्यात येत नसल्याची न्यायालयाने दखल घ्यावी अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली होती.ही याचिका इंजिनियर नयाधर पाढियाल यांनी दाखल केली होती. यापूर्वी पाढियाल यांनी कोरोनाविरोधात लाल मुंग्यांच्या चटणीच्या वापराबाबत सूचना केली होती. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली. पाढियाल यांच्या मते, या चटणीमध्ये फॉर्मिक अॅसिड, प्रोटिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२, झिंक आणि लोह यांचा समावेश असतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय येथील आधिवासी लाल मुंग्या खातात. तसेच अनेक आजारांवर उपचारांमध्ये त्याचा वापर करतात. त्यामुळेच आदिवासी भागात कोरोनाचा तितकासा फैलाव झाला नाही, असा दावा त्यांनी केला.