नवी दिल्ली - लाल किल्लादेखील देश्द्रोहींनी बांधला आहे, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावरुन तिरंगा फडकावणं बंद करणार का ? असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला आहे. ताजमहाल देशद्रोहींनी बांधला आहे या भाजपा आमदार संगीत सोम यांच्या वक्तव्यावर टीका करताना त्यांनी हा प्रश्न विचारला. जर ताजमहाल देशद्रोहींनी बांधला असेल, तर योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी पर्यटकांना तिकडे न जाण्याचं आवाहन करणार का ? हा प्रश्नदेखील ओवेसी यांनी विचारला आहे. ओवेसी एवढ्यावरच थांबले नाहीत. हैदराबाद हाऊसचं बांधकामदेखील देशद्रोहींनी केलं आहे, मग मोदी परदेशी पाहुण्यांना घेऊन तिथे भेट देणं थांबवणार का ? असंही असदुद्दीन ओवेसी यांनी विचारलं आहे.
भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश असणारा ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील डाग असल्याचं संगीत सोम बोलले आहेत. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 'ताजमहाल बांधणा-यांनी उत्तर प्रदेश आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं असं संगीत सोम बोलले आहेत. अशांची नावे जर इतिहासात असतील, तर ती बदलली जातील', असं संगीत सोम बोलले आहेत. महत्वाचं म्हणजे, उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळल्याने नवा वाद उफाळला आला होता. यानंतर पर्यटनमंत्री रिटा बहुगुणा यांनी ताजमहाल हा सांस्कृतिक वारसा असल्याचे सांगून सारवासरव करण्याचा प्रयत्न केला होता. सोशल मीडियावर यावरुन प्रचंड टीका झाली होती.
सोम मेरठ येथील सिसौली गावात आयोजित कार्यक्रमात संगीत सोम बोलत होते. ते बोलले की, 'उत्तर प्रदेशात एक अशी निशाणी आहे, जिला नाही म्हटलं पाहिजे. ताजमहालला ऐतिहासिक स्थळांच्या यादीत स्थान दिलं नाही म्हणून अनेकांना दु:ख झालं. कसला इतिहास, कुठला इतिहास, कुणाचा इतिहास ? तो इतिहास का, ज्यामध्ये ताजमहाल बनवणा-याने आपल्या बापाला कैद केलं होतं ? तो इतिहास का, ज्यामध्ये ताजमहाल बनवणा-याने उत्तर प्रदेश आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं ? अशा लोकांचं नाव जर आजही इतिहासात असेल, तर हे खूपच दुर्भाग्यपुर्ण आहे. मी गॅरंटी देऊन सांगतो की इतिहास बदलला जाईल'.
योगी आदित्यनाथ सरकारने या अर्थसंकल्पात ताजमहालला सांस्कृतिक वारसा स्थळांच्यायादीत समाविष्ट केले नव्हते. त्यांनी ताजमहालला भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानण्यास नकार दिला होता. ताजमहल हा एका इमारतीशिवाय काहीही नाही, असे ते म्हणाले होते. भारताचे पंतप्रधान परदेशी जाताना तेथील राष्ट्रप्रमुखांना आपल्या सांस्कृतीचे प्रतिनिधित्व करणा-या वस्तू घेऊन जात. त्यात ताजमहालची प्रतिकृती असे, तसेच परदेशी पाहुण्यांनाही भारतात आल्यावर ती दिली जात असे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा परदेशात गेले, तेव्हा त्यांनी संबंधित देशांच्या प्रमुखांना भगवद्गीता व रामायणच्या प्रती भेट म्हणून दिल्या होत्या, याचा उल्लेख आदित्यनाथ यांनी बिहारमधील एका मेळाव्यात केला होता.