लंडन : शास्त्रज्ञांनी मध्य भारतात लाल शेवाळाच्या १.६ अब्ज वर्षे जुन्या जीवाश्माचा शोध लावला असून, पृथ्वीवर सापडलेला वनस्पतीच्या रूपातील जीवनाचा हा सर्वात प्राचीन पुरावा असू शकतो. स्विडीश म्युझियम आॅफ नॅचरल हिस्ट्रीच्या संशोधकांनी मध्यप्रदेशच्या चित्रकूट भागात या जीवाश्माचा शोध लावला. बहुपेशीय जीव यापूर्वी मानण्यात येणाऱ्या काळाच्या कितीतरी आधी उत्क्रांत झाले होते हे या शोधावरून स्पष्ट होते. पृथ्वीवरील जीवनाचे जे सर्वात जुने पुरावे मिळाले आहेत ते ३.५ अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत; परंतु हे पुरावे एकपेशीय जीवांचे आहेत. यापूर्वीच्या शोधात आढळून आलेले बहुपेशीय जीव फार फारतर ६० कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. त्यापूर्वीच्या बहुपेशीय जीवांच्या अवशेषांचा शोध लागण्याचे प्रमाण तुरळक असून, त्यांचे अर्थघटन करणेही कठीण आहे. यापूर्वी सापडलेले सर्वात जुने लाल शेवाळ १.२ अब्ज वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे बहुपेशीय जीवनाचा कालखंड तेव्हापासूनचा मानला जातो. संशोधकांना लाल शेवाळासारखे दिसणारी दोन प्रकारची जीवाश्मे चित्रकूटमध्ये दरडींच्या खाली चांगल्या स्थितीत मिळाली. शास्त्रज्ञांना या जीवाश्मातील भिन्न अंतर्गत पेशीरचनेचे अवलोकनही करता आले. अभ्यासाअंती त्यांनी हे लाल शेवाळाचे जीवाश्म असल्याचा निष्कर्ष काढला. हे अत्यंत प्राचीन जीवाश्म कशाचे आहे हे तुम्ही ठामपणे सांगू शकणार नाही. कारण, कोणताही डीएनए उरलेला नाही; परंतु एकूण गुणधर्मांवरून हे जीवाश्म लाल शेवाळाचे असावे, असे स्विडीश म्युझियम आॅफ नॅचरल हिस्ट्रीचे प्रोफेसर स्टीफन बेंगस्टोन यांनी सांगितले. दृष्टिगोचर जीवांचा काळ आपल्याला वाटतो त्याच्या कितीतरी आधी सुरू झाला असावा. गाळापासून तयार झालेला आणि कॅल्शियम फॉस्फेटचे अधिक प्रमाण असलेल्या दगडात हे लाल शेवाळ आढळून आले. हा दगड १.६ अब्ज वर्षांपूर्वीचा आहे.
भारतात आढळले लाल शेवाळाचे १.६ अब्ज वर्षे जुने जीवाश्म
By admin | Published: March 16, 2017 12:41 AM