पुणे : प्रवासी कार किंवा टॅक्सीमधील दरवाजांमध्ये ‘चाइल्ड लॉक’ यंत्रणा बसविण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ जुलै २०१९ पासून होणार आहे. ‘चाइल्ड लॉक’चा गैरवापर होत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. कार उत्पादन कंपन्यांकडून दरवाजांना ‘चाइल्ड लॉक’ ही अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कार रस्त्यावर धावत असताना अनेकदा लहान मुले दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अपघात होण्याची शक्यता असते. ‘चाइल्ड लॉक’ यंत्रणेद्वारे चारही दरवाजे उघडण्याचे बटन चालकाजवळ दिले जाते. या बटनावर चारही दरवाजे उघडण्याचे नियंत्रण अवलंबून असते. त्यामुळे चालकाशिवाय कोणीही दरवाजा उघडू शकत नाही. मात्र, या यंत्रणेचा प्रवासी कार किंवा टॅक्सीमध्ये गैरवापर होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रवासी कारबाबत नेमलेल्या समितीने दोन वर्षांपूर्वी ‘चाइल्ड लॉक’ यंत्रणेवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. ही शिफारस मंत्रालयाने स्वीकारली आहे. त्यानुसार रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्यांच्या परिवहन विभागाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रवासी कार उत्पादक कंपन्यांना चाइल्ड लॉक प्रणाली न बसविण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी दि. १ जुलै २०१९ पासून केली जाणार असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे.चाइल्ड लॉकचा गैरवापरप्रामुख्याने प्रवासी कारमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी चाइल्ड लॉक ही यंत्रणा धोकादायक आहे, असे केंद्रीय मंत्रालयाने म्हटले आहे.मागील काही वर्षांत धावत्या प्रवासी कार-टॅक्सीमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.चालकाने चाइल्ड लॉक केल्याने महिलांना दरवाजा उघडून मदत मागणे शक्य होत नाही. त्याचाच गैरफायदा घेतला गेल्याचे प्रकार समोर आले आहेत.
‘चाइल्ड लॉक’ यंत्रणेला मिळाला रेड सिग्नल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 3:42 AM