हैदराबाद : तेलगू देसमचे खासदार (टीडीपी) जे. सी. रेड्डी यांनी आठ देशी विमान कंपन्यांनी त्यांच्यावर लादलेल्या प्रवासबंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी केलेली याचिका हैदराबाद उच्च न्यायालयाने बुधवारी दाखल करून घेतली. विशाखापट्टणम विमानतळावर रेड्डी यांनी गेल्या महिन्यात इंडिगो विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याशी बेशिस्त वर्तन केल्यानंतर त्यांच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. देशांतर्गत विमान प्रवासावर घालण्यात आलेली बंदी बेकायदेशीर ठरवण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करावा व विमान कंपन्यांना मला प्रवास करू देण्यास परवानगी देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. १६ जून रोजी रेड्डी विमानतळावर आले व त्यांनी इंडिगाच्या केबिनमध्ये प्रवेश केला. त्यांना हैदराबादला जाणाऱ्या विमानात बसण्याचा पास न दिल्यामुळे ते कर्मचाऱ्यावर ओरडले. विमानात बसण्याची वेळ संपल्यानंतर ते विमानतळावर आले त्यावेळी विमान उड्डाणाच्या तयारीत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंगमध्ये रेड्डी बोर्डिंग पास प्रिंटरवर तडाखा देताना आणि कर्मचाऱ्याला केबिनबाहेर ढकलताना ते दिसत होते. इंडिगो कंपनीनंतर एअर इंडिया, जेट एअरवेज आणि स्पाईसजेटनेही रेड्डी यांच्यावर प्रवासाची बंदी घातली.>मी हल्ला केला नाहीमी कर्मचाऱ्यावर हल्ला केलेला नाही, असे रेड्डी यांनी वारंवार सांगितले व क्षमा मागायला नकार दिला. राष्ट्रीय पातळीवर उड्डाणास बंदी असलेल्या प्रवाशांची अंतिम यादी नागरी विमान वाहतूक मंत्रालय करीत असून तिची अमलबजावणी पुढील महिन्यात सुरू होईल. प्रस्तावानुसार कामात अडथळा आणणाऱ्या प्रवाशांवर तीन महिन्यांपासून ते बेमुदत काळापर्यंत प्रवासबंदी लागू होईल.
विमान प्रवासबंदीला रेड्डींचे आव्हान
By admin | Published: July 13, 2017 12:24 AM