आम आदमी पक्षाचे राज्यसभेमधील खासदार राघव चड्डा यांनी राजकारणात तरुणांच्या भागीदारीचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला. तसेच देशामध्ये तरुण मतदारांची संख्या अधिक असल्याने लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा घटवण्याची मागणी केली. सध्या लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा २५ वर्षे आहे. ही वयोमर्यादा घटवून २१ वर्षे करण्याची मागणी राघव चड्डा यांनी केली आहे.
निवडणूक लढवण्यासाठीच्या वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित करताना राघव चड्डा म्हणाले की, भारताचं सरासरी वय हे केवळ २९ वर्षे आहे. आपल्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. सुमारे ५० टक्के लोकसंख्या ही २५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. मात्र आमचे नेते, आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी एवढे तरुण आहेत? देशामध्ये स्वातंत्र्यानंतर जेव्हा पहिल्यांदा निवडणुका झाल्या, तेव्हा पहिल्या लोकसभेमध्ये २६ टक्के सदस्य हे ४० पेक्षा कमी वयाचे होते. मात्र १७ व्या लोकसभेमध्ये केवळ १२ टक्के सदस्य हे ४० पेक्षा कमी वयाचे होते. जसजसा देश तरुण होत आहे, तसतसं आमच्या नेत्यांचं वय हे वाढत चाललेलं आहे. आपण तरुण नेत्यांसोबत तरुण देश बनण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, असे राघव चड्डा म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, सध्या राजकारणाकडे एक बॅड प्रोफेशन म्हणून पाहिलं जातं. मुलं मोठी होतात, तेव्हा आई वडील त्यांना डॉक्टर, इंजिनियर व्हा, क्रीडापटू व्हा, असं सांगतात, मात्र कुणीही मोठा होऊन नेता हो, असं कुणी सांगत नाही. सध्या तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी काही सल्ला देऊ इच्छितो. आपल्या देशात निवडणूक लढण्यासाठीची वयोमर्यादा २५ वर्षे एवढी आहे. ही वयोमर्यादा घटवून २१ वर्षे केली गेली पाहिजे. जर कुणी वयाच्या २१ व्या वर्षी निवडणूक लढवू इच्छित असेल तर त्याला लढू दिलं पाहिजे. जर १८ वर्षांचा तरुण मतदान करून सरकार निवडू शकत असेल. तर तो २१ व्या वर्षी निवडणूक का लढू शकत नाही, असा सवाल राघव चड्डा यांनी विचारला.