नवी दिल्ली : नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सुस्त पडलेल्या अर्थव्यवस्थेला गती आणण्यासाठी अप्रत्यक्ष करात तत्काळ कपात करायला हवी, असे मत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले. चिदंबरम म्हणाले की, अर्थसंकल्प दिशाहीन आहे. नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. २०१६-१७ या वर्षात जीडीपी वृद्धीवर याचा परिणाम झाला आहे. तर, २०१७-१८ मध्येही याचा प्रभाव राहिल. २०१८-१९ च्या सुरुवातीलाही याचा प्रभाव राहिल. तरुणांसाठी रोजगार नसणे हे घातक ठरु शक ते. तरुणांमध्ये खदखदत असलेला हा राग आक्रमकपणे व्यक्त होऊ शकतो. चिदंबरम म्हणाले की, या अर्थसंकल्पाचा अखेर काय उद्देश आहे? उद्देश नसलेला व दिशाहीन असा हा अर्थसंकल्प आहे. नोटाबंदीमुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याची संधी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गमावली आहे. सर्व करात ते ४ ते ८ टक्क्यांपर्यंत कपात करु शकत होते. अर्थात, ही कपात जीएसटी अमलात येईपर्यंतच करता येईल. त्यांच्याकडे आठ महिन्यांचा अवधी आहे. अप्रत्यक्ष करात कपात १ फेब्रुवारीपासून अमलात येऊ शकते आणि मला नाही वाटत की, जीएसटी १ आॅक्टोबरच्या पूर्वी अमलात येऊ शकेल. नोटाबंदीबाबत बोलताना ते म्हणाले की, आता तर पूर्ण जग हे मान्य करत आहे की, आर्थिक वृद्धी कमी होईल. २०१५-१६ मध्ये जीडीपी वृद्धी दर ७.६ टक्के होता. तर, चालू वर्षात तो कमी होऊन रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार ६.९ टक्के, आर्थिक सर्व्हेक्षणानुसार ६.७५ टक्के राहिल.
अप्रत्यक्ष करात कपात करा
By admin | Published: February 13, 2017 12:31 AM