नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलवरील अबकारी कर केंद्र सरकारने कमी केल्याच्या निर्णयाचा नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांशी काहीही संबंध नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. केंद्र सरकार खर्चात करत असलेली बचत तसेच पर्यावरण रक्षणाचे धोरण यामुळे येत्या दोन वर्षांत देशात इलेक्ट्रिक वाहने व पर्यायी इंधनाचा वापर वाढणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एका परिषदेत गडकरी म्हणाले की, हा निर्णय केंद्र सरकारने पोटनिवडणुकांपूर्वी नव्हे तर त्यांच्या निकालानंतर घेतला आहे. सध्या देशात दरवर्षी आठ लाख कोटी रुपयांच्या क्रूड तेलाची आयात करण्यात येते. उत्तम दर्जाच्या इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करणे, फ्लेक्स इंजिन, इलेक्ट्रिक कार वापरण्यासाठी दिलेले प्रोत्साहन अशी पावले उचलली आहेत.
मुंबई - दिल्ली एक्स्प्रेस हायवेचे काम वेगाने सुरू
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, देशाच्या २३ हरितक्षेत्रात राष्ट्रीय महामार्गांची वेगाने बांधणी सुरू आहे. त्यात मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवेचाही समावेश आहे. सुमारे १३५० किमीचा मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवे हा जगातील अशा प्रकारचा सर्वाधिक लांबीचा रस्ता ठरेल. या रस्त्यामुळे दोन शहरांतील प्रवासाचा कालावधी १३ तासांपर्यंत कमी होईल.