हरिश गुप्तानवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावरील अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. जागतिक अहवालानुसार (वर्ल्ड रोडस्टॅटीस्टिक्स२०१८) भारतात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण देशांत सर्वाधिक आहे; परंतु, मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षात केलेल्या प्रयत्नांमुळे स्थिती सुधारली आहे.
२०१८मध्ये ६.६४ टक्के होते, ते २०१९ मध्ये ६.०९ टक्क्यांवर आले असून अपघाती मृत्यू आणि जखमीं होण्याचे प्रमाणही घटले आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागच्या आठवड्यात लोकसभेत पूनम महाजन यांच्या प्रश्नाला उत्तरादाखल उपरोक्त माहिती दिली. २०१८ च्या तुलनेत महाराष्ट्रासह देशभरात २०१९ मध्ये कमी अपघात घडले, या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ गडकरी यांनी ही आकडेवारी दिली. केंद्रीय मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते सुरक्षा मुद्याचे निराकरण करण्यासाठी बहुस्तरीय रणनीती केली आहे.
गडकरी यांनी लोकसभेतील खासदाराच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात लोकजागृतीसाठी खासदारांची रस्ते सुरक्षा समिती स्थापन करण्याची कल्पना विकसित केली आहे. यात राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करुन त्यात सुधारणा करणे यासारख्या रस्ते स्थापत्य अभियांत्रिकीवर विशेष भर देण्यात आला आहे.
अपघातानंतरच्या पहिल्या महत्त्वाचा तासात अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी रोकडरहीत योजना सुरु करण्यात आली असून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल नाक्यांवर ५५० रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. अतिवेगाने, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, चुकीच्या बाजुने वाहन चालविणे तसेच वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर, वाहनांतील यांत्रिकी दोष, हवामान आणि वाहतुकीसंदर्भातील रस्त्यांवरील मार्गदर्शक खुणासंबंधी माहितीचा अभाव आदी अपघातामागची कारणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.