नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत नवभारताचा उद्य झाला आहे. भारताने कोरोना साथीचा ज्या समर्थपणे मुकाबला केला त्यातून हे दिसून आले. देशातील प्रादेशिक असमानता कमी होऊ लागली आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटले आहे.
७६व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी त्यांनी जनतेला उद्देशून संदेश दिला. राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, देशात आर्थिक सुधारणांबरोबरच समाजाच्या कल्याणासाठी नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. जागतिक स्तरावरील विविध प्रवाहांवर मात करून देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे राष्ट्रपती मुर्मु यांनी कौतुक केले.
राष्ट्रपती मुर्मु यांनी सांगितले की, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशातील गरिबी, निरक्षरतेच्या मोठ्या प्रमाणामुळे इथे लोकशाही व्यवस्था रुजेल की नाही याविषयी विविध देशांचे नेते, तज्ज्ञ यांच्या मनात अनेक शंका होत्या. मात्र त्या साऱ्या शंका भारतीयांनी खोट्या ठरविल्या. भारतामध्ये लोकशाही व्यवस्था केवळ रुजलीच नाही तर विकसितही झाली.