नवी दल्ली : कोरोना संसर्गामुळे सचिंत बनलेल्या भारतीयांसाठी तेल विपणन कंपन्यानी शुक्रवारी खूषखबर देताना स्वयंपाकाच्या विना अनुदान गॅस सिलिंडरच्या दरात घसघशीत कपात केली. विनाअनुदान गॅस सिलिंडर तब्बल १६२.५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. हल्लीच्या काळातली ही तिसरी दरकपात आहे.दिल्लीतील ग्राहकांना आता १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडर ७४४ रुपयांऐवजी ५८१.५० रुपयांना मिळेल. मुंबईकरांना त्यासाठी ६७९ रुपये मोजावे लागत होते; तेथे आता ५१४.५० रुपयांना सिलिंडर उपलब्ध असेल. गेली काही वर्षे एलपीजी गॅस सिलिंडरांच्या किमतीचा दर महिन्याच्या पहिल्या तारखेस आढावा घेऊन मूल्य निश्चित केले जाते. आॅगस्ट २०१९पासून हे दर सातत्याने वाढतच होते. मात्र जागतिक उर्जा बाजारपेठेतल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर मार्च आणि एप्रिल २०२० मध्ये त्यांत किंचित कपात करण्यात आली होती. त्या मानाने ही तिसरी कपात भरीव समजली जाते.मार्चअखेरीस देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर देशभरात वस्तूंचा साठा करून ठेवण्याची धांदल उडाली होती. त्यावेळीही अनेकानी अतिरिक्त गॅस सिलिंडर घेऊन ठेवले होते. सिलिंडरचा मुबलक साठा देशात असून घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याची ग्वाही विक्रेत्यांनी तसेच तेल कंपन्यांनी देऊनही भारतीय ग्राहक आश्वस्त झालेला नव्हता. देशातील अग्रगण्य इंधन उत्पादक असलेल्या इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने एप्रिल महिन्यातील सिलिंडर विक्रीत तब्बल २०% वाढ झाल्याचे जाहीर केले आहे.भारतातली गॅस सिलिंडरची किंमत दोन घटकांवर अवलंबून असते; अमेरिकेचे चलन असलेल्या डॉलरच्या तुलनेतले भारतीय रुपयाचे मूल्य आणि एलपीजी अर्थात द्रवरूप पेट्रोलियम वायूचा आंतरराष्ट्रीय प्रमाणित दर. देशभरात स्वयंपाकाचा एलपीजी विवक्षित दरात उपलब्ध असतो, मात्र प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी १२ सिलिंडर अनुदानित किमतीत दिले जातात. हे अनुदान प्रत्यक्ष विक्रीवेळी न देता नंतर ग्राहकाच्या बँक खात्यात वळते केले जाते. देशात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची लाभार्थी असलेल्या ८ कोटी कुटुंबांना मोफत ३ गॅस सिलिंडर पुरवण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राबवली असून ती जूनपर्यंत कार्यान्वित असेल.
CoronaVirus News: विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात, १६२.५0 रुपयांनी घसरले दर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 2:59 AM