अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येत आहे. या काही तांत्रिक कारणास्तव येथे फेरमतदान घेण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. वडगाम, वीरामगाम, दस्करोई आणि सावली मतदार संघातील सहा मतदान केंद्रांवर हे फेरमतदान घेण्यात येत आहे. या सहा मतदान केंद्रांवर मतदानापूर्वी मतदान यंत्र्यांच्या तपासणीसाठी घेण्यात आलेल्या प्रायोगिक मतदानाचा डेटा हटवण्यास निवडणूक अधिकारी विसरले होते. त्यामुळे हे फेरमतदान घेण्यात येत आहे. वडगाम विधानसभा मतदार संघातील छानिया-1 आणि छानिया -2, विरामगाम विधानसभा मतदारसंघातील बुथ क्र.27, दस्करोई मतदारसंघातील नारोदा, सावली मतदारसंघाती नहारा -1 आणि सकारदा-7 या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात येत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 9 आणि 14 डिसेंबर रोजी दोन टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. येत्या 18 डिसेंबरला गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघांत गेल्या शनिवारी ६८ टक्के मतदान झाले होते. याआधी २0१२ च्या निवडणुकीत ७0.७४ टक्के मतदान झाले होते. मात्र सुरुवातीच्या काही तासांतच मतदान यंत्रांबाबत अनेक तक्रारी आल्या. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड, तर काही ठिकाणी छेडछाडीच्या तक्रारी मतदारांनी केल्या. अशा शंभरहून अधिक तक्रारी आल्या. तर 14 डिसेंबरला झालेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानामध्ये एकूण 68.70 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गुजरातमधील शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी संपताच विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) अंदाज आले होते. त्यापैकी बहुतेक सर्वच एक्झिट पोलमधून गुजरातेत भाजपाच पुन्हा एकवार मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल, असे एकमत दिसून आले. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील संपताच गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये घेतलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. त्यांच्या निष्कर्षात भाजपा व काँग्रेस या दोन पक्षांना मिळू शकणा-या जागांबाबत एकमत नसले, तरी गुजरातमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता येईल आणि हिमाचल प्रदेशात सत्तांतर होऊन आणखी एक काँग्रेसशासित राज्य भाजपाच्या झोळीत जाईल, यावर या सर्वांमध्ये एकवाक्यता आहे.
गुजरातमधील सहा मतदान केंद्रांवर फेरमतदानाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 8:48 AM