मुंबई : सहारा उद्योगसमूहातील सहारा इंडिया कमर्शियल कॉर्पोरेशनने नियमबाह्य पद्धतीने बाजारातून उभी केलेली १४ हजार कोटी रुपयांची रक्कम सुमारे दोन कोटी गुंतवणूकदारांना व्याजासह परत करावी, असा आदेश सेबीने दिला आहे.कंपनीने बाजारातून भांडवल उभारणीसाठी असलेल्या नियमांचे पालन न करता १९९८ ते २००९ या काळात ‘आॅप्शनली फुल्ली कन्व्हर्टिबल डिबेंचर’द्वारे एक कोटी ९८ लाख ३९ हजार ९३९ गुतवणूकदारांकडून १४,१०० कोटी रुपये उभे केले. या प्रकरणी सुनावणीचा निकाल देताना ‘सेबी’च्या पूर्णवेळ सदस्या माधवी पुरी बुच यांनी हा आदेश दिला. कंपनीने रक्कम १५ टक्के व्याजासह परत करायची आहे.कंपनीचे प्रमुख सुब्रतो रॉय व अन्य १४ संचालकांवर पुढील चार वर्षे रोखे बाजारात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष व्यवहार करण्यासही बंदी घातली आहे. ही कंपनी वा संचालक शेअर बाजारात नोंदणी केलेल्या कोणत्याही कंपनीच्या भांडवल उभारणीशी संबंधित व्यवहारांशी चार वर्षे कोणताही संबंध ठेवू शकणार नाहीत, असेही आदेशात म्हटले आहे. कंपनीच्या त्या काळातील संचालकांपैकी चार संचालक आज हयात नाहीत. त्यांच्या कायदेशीर वारसांवर हा आदेश लागू होईल.कंपनीने सर्व स्थावर-जंगम मालमत्ता, बँक खाती संपत्तीचा तपशील सादर करावा, असेही ‘सेबी’ने सांगितले आहे. पैसे परत करण्यासाठी कंपनी मालमत्ता विकू शकेल. मात्र त्यातून मिळणारी रक्कम ‘सेबी’कडील ‘सहारा परतावा खात्या’त लगेचच्या लगेच जमा करावी लागेल. परतावा केव्हा व कसा करणार याची माहिती १५ दिवसांत दोन प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीद्वारे करायची आहे.दुसरा घोटाळासहाराच्या संदर्भात ‘सेबी’ने आदेश देण्याची दुसरी वेळ आहे. याआधी सहारा इंडिया रिअल इस्टेट व सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट दोन कंपन्यांनी ‘ओएफसीडींद्वारे गोळा केलेले ४० हजार कोटी रुपये गुंतवणूकदारांना सव्याज परत करण्याचा आदेश दिला होता. त्याचे पालन न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुब्रतो रॉय व अन्य दोन संचालकांना तुरुंगात टाकले. जामिनासाठी १० हजार कोटी रुपयेही भरता न आल्याने रॉय तुरुंगातच आहेत.
गुंतवणूकदारांना १४ हजार कोटी सव्याज परत करा; सहाराला सेबीचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 1:50 AM