नवी दिल्ली : लोकसभा निवडणू प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य नेत्यांच्या विधानांमुळे झालेला निवडणूक आचारसंहितेचा कथित भंग व चौकशीनंतर या नेत्यांना दिलेली क्लीन चिट याबद्दलचा तपशील उघड करण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला. या प्रकरणांच्या माहितीच्या संकलनात खूप वेळ व संसाधने खर्ची पडणार असल्याचे कारण आयोगाने नकार देताना पुढे केले आहे.
या तपशीलासाठी माहिती अधिकाराद्वारे निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला होता. निवडणूक आचारसंहिता भंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काही जणांनी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणांत दोन निवडणूक आयुक्तांपैकी एकाने मोदींविरोधात मत नोंदविले होते. त्या मतांचा तपशील देण्यासही निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारी विविध राज्यांतून करण्यात आल्या आहेत. तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणांची चौकशी करून आपले अहवाल आयोगाला सादर केले. त्याची संकलित माहिती आयोगाकडे उपलब्ध नाही. तशा स्वरूपात माहिती एकत्रित करणे हे वेळखाऊ काम आहे, असे निवडणूक आयोगाने अर्जदाराला कळविले. मोदी व अन्य नेत्यांच्या विरोधातील प्रत्येक तक्रार, त्याबद्दल अंतिम निर्णय घेण्यासाठी आयोजिलेल्या बैठकीत जी चर्चा झाली त्यातील प्रत्येक मुद्दा, निवडणूक आयुक्तांनी नोंदविलेले विरोधी मत यांचा सविस्तर तपशील अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे मागितला होता.महाराष्ट्रातील दोन वादग्रस्त वक्तव्येअल्पसंख्याकांचा प्रभाव असलेल्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे १ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक प्रचारसभेत टीका केली होती. बालाकोटमध्ये हवाई हल्ले करणाऱ्यांना तसेच पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना स्मरून मते द्या असे आवाहन मोदी यांनी लातूर येथील सभेत नवमतदारांना केले होते. या उद्गारांमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने मोदी यांना क्लीन चिट दिली.