नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील एका कंपनीला करण्यात आलेल्या कोळसा खाणपट्टय़ाच्या वाटपाच्या संदर्भात दाखल केलेला खटला, पुरेशा पुराव्यांअभावी, बंद करावा यासाठी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) केलेला अर्ज (क्लोजर रिपोर्ट) येथील विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळला व माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता व सेवेतील दोन सरकारी अधिका:यांसह संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिका:यांवर आरोपी म्हणून समन्स बजावण्याचा आदेश दिला.
सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी सांगितले की, आरोपींविरुद्धच्या गुन्ह्यांची दखल घेऊन मी त्यांच्याविरुद्ध समन्स काढत आहे. सविस्तर निकाल नंतर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. यानुसार गुप्ता, दोन सरकारी अधिकारी व कमल स्पंज स्टील अॅण्ड पॉवर कं, त्यांचे व्यवस्थापकीय संचालक पवन अहलुवालिया.
वरिष्ठ अधिकारी अमित गोयल व संचालकांविरुद्ध31 ऑक्टोबर रोजी न्यायालयात जातीने हजर होण्याचे समन्स जारी केले गेले. तपासी अधिका:याने सर्व आरोपींवर समन्स बजावावेत आणि पुढील तारखेच्या आत आरोपींना द्यायच्या कागदपत्रंची पूर्तता करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले.
खोटी माहिती देऊन व लेखापुस्तकांमध्ये हेराफेरी करून प्रत्यक्षात अपात्र असलेल्या कमल स्पंज स्टील कंपनीस कोळसा खाणपट्टा दिला गेला, अशा आरोपावरून गुन्हा नोंदवून सीबीआयने हा खटला दाखल केला होता. मात्र तपासात ठोस पुरावे मिळाले नाहीत, असे सांगत खटला बंद करण्याची विनंती केली होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)