- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पंजाब विधानसभेच्या निवडणुकांची जबाबदारी आपल्याकडे द्यावी आणि आपणच काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असू, हे जाहीर करावे, ही नवज्योत सिंग सिद्धू यांची मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फेटाळून लावली आहे.
पंजाबमधील विधानसभेच्या निवडणुकांसाठी नेतृत्व सामूहिकच असेल, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले असून, मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, नवज्योत सिद्धू व सुनील जाखड या तिघांनी प्रचारात पक्षाचे सामूहिक नेतृत्व करावे, असेही ठरविले आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी व अंबिका सोनी यांच्याशी विचारविनिमय करून सोनिया गांधी यांनी हे ठरविल्याचे समजते.
गेल्या विधानसभा निवडणुका काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या. त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही पक्षाने जाहीर केले होते. यावेळी आपल्या नावाची घोषणा करावी, यासाठी नवज्योत सिद्धू पक्षश्रेष्ठींवर सातत्याने दबाव आणत होते.
जागा पाहून निर्णयमुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आधी जाहीर केल्यास पक्षात गटबाजीला उत्तेजन मिळेल. त्यामुळे निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या जागांच्याआधारे मुख्यमंत्री कोण, हे ठरवावे, असे अंबिका सोनी व पवनकुमार बन्सल यांनी सुचविले होते.