नांदेड - प्रसिद्ध अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मांतोडकर यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 बद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. कलम 370 वर प्रतिक्रिया देण्यास आता उशिर झाला आहे. ते हटवणं हे ऑफिशियल गोष्ट करणे बाकीचं होतं. कलम 370 हटविल्यामुळे काश्मीरमध्ये विकास होणार असेल, तेथील लोकांचं जीवनमान सुधारणार असेल तर उत्तमच आहे, असे उर्मिला यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यासोबतच सरकारने ज्या पद्धतीने हे कलम हटवलं, त्याला विरोध दर्शवला आहे. यावेळी, काँग्रेस नेते अशोक चव्हाण हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
मोदी सरकारने संसदेतील चर्चासत्राच अचानकपणे कलम 370 हटविल्यानंतर देशभरात एकच चर्चा सुरू झाली. देशभरात अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं, तर काश्मीरमधील काही नागरिकांनी यास विरोध केला आहे. काँग्रेसनेही कलम 370 हटविण्याच्या विधेयकास आपला विरोध दर्शवला होता. हे कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काश्मीरला भेट दिली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव राहुल यांना श्रीनगर विमानतळावरुनच परत फिरावे लागले. त्यामुळे, अद्यापही काश्मीरमधील परिस्थिती काही प्रमाणात तणावग्रस्त असल्याचे दिसून येते.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कलम 370 बाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. प्रश्न केवळ 370 हटविण्याचा नसून ते ज्या प्रकारे हटविले गेले ते महत्त्वाचं आहे. ते अमानुष पद्धतीनं करण्यात आलं आहे. माझे सासू-सासरे दोघेही काश्मीरमध्ये राहतात. दोघांनाही डायबेटीस आहे, हायब्लड प्रेशर आहे. आजचा 22 वा दिवस आहे, माझं आणि माझ्या नवऱ्याचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. त्यांना सध्या जी औषधं लागतात, इंजक्शन हवंय, तेही त्यांच्याकडे आहे की नाही, हे आम्हाला माहित नाही. 370 नेमकं काय आहे, त्याचे परिणाम काय होतात हेही लोकांना बऱ्याचदा माहित नसतं, असे म्हणत उर्मिला यांनी कलम 370 हटविण्याच्या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे.