सातारा : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्या राजीनाम्याबाबत शनिवारी ‘आर या पार’चा निर्णय होणार आहे. जिल्हा बँकेच्या मासिक सभेनंतर ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होणार असली तरी खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनाम्यासाठी घायकुतीला आलेल्या नेत्यांना ‘घी देखा है लेकिन बडगा नही देखा,’ या भाषेत शुक्रवारी सुनावले आहे. जिल्हा परिषदेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीकडे आपला राजीनामा सादर केला; पण उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय झाला नव्हता. या पेचप्रसंगात अडकून न राहता साळुंखे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये जोरदार खलबत्ते सुरू झाली.दुसऱ्या बाजूला आमदार शशिकांत शिंदे यांनीही खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी याबाबत बोलणी केली. उदयनराजेंच्या आदेशाशिवाय राजीनामा देणार नसल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट केले होते. राष्ट्रवादीने त्यांना ३१ जानेवारीची मुदत दिली होती. त्यापूर्वी राजीनामा न दिल्यास पुढील कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. खासगी कामानिमित्त बाहेरगावी असल्याने साताऱ्यात येऊ न शकलेल्या उदयनराजेंशी आ. शशिकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन याबाबत बोलणी केली. त्यामुळे शनिवारी खासदार उदयनराजे यांनी सूचना केल्या तर उपाध्यक्षांचा राजीनामा पक्षाकडे सादर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. साहजिकच, उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालींना तूर्तास अल्पविराम मिळाला आहे. दरम्यान, या हालचाली सुरू असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी एक पत्रक प्रसिद्धीला दिले. या पत्रकामध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. किमान पवारांचा अपमान होईल अशा वावड्या उठवू नयेत. रवी साळुंखे यांना खुर्चीवर बसविताना अंतिम चर्चा पवारांशी केली होती. गल्लीपेक्षा दिल्लीत आम्ही नेहमीच एकत्र येत असतो. मध्यंतरी त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना आम्ही गल्लीतील गोष्टी सांगितल्या नाहीत ; परंतु सूतोवाच केले होते. त्यावेळी दिल्लीत चर्चा करु, असे पवारांनी सांगितले होते. ते सांगतील त्यानुसारच आम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार होतो, अशी माहिती या प्रसिद्धी पत्रकात उदयनराजेंनी दिली आहे. (प्रतिनिधी)उपाध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत अधिवेशन काळात शरद पवार यांच्याशी बोलून निर्णय घेणार होतो; मात्र काहीजण त्याआधीच ‘घायकुती’ला आले आहेत. कोणत्याही पदाला काही कालावधी हा समजून उमजून घेण्याकरिता जात असतो, त्यामुळे विद्यमान पदाधिकारी बदलाची टूम कोणी आणि का काढली, हे समजून येत नाही.- उदयनराजे भोसले, खासदारउपाध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीत शरद पवारांशी चर्चा करण्यात येणार असल्याचा ‘सांगावा’ एका व्यक्तीजवळ धाडला होता; पण संबंधिताने तो पोहोचविलाच नाही, असे उदयनराजेंनी पत्रकात म्हटले आहे. आता हा ‘सांगावा’ आणणारी व्यक्ती कोण?, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाने ३१ जानेवारीपर्यंत राजीनामे सादर करण्याची मुदत दिली होती. या तारखेपर्यंत सर्वांचे राजीनामे होतील. पक्षाच्या नेतेमंडळींनी याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन बोलणी केली आहेत. - बाळासाहेब भिलारे, राष्ट्रवादी पक्षप्रतोद, जिल्हा परिषद
राजीनाम्याचं ‘घी’ की राजेंचा ‘बडगा’?
By admin | Published: January 29, 2016 10:28 PM