नवी दिल्ली - भारतात तयार होणारी स्वदेशी लस आता ब्राझीललाही निर्यात केली जाणार आहे. 'कोव्हॅक्सीन' तयार करणारी औषध निर्माता कंपनी भारत बायोटेकने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे, की ब्राझीलला लस सप्लाय करण्यासाठी प्रीसिसा मेडिकामेंटो सोबत करार करण्यात आला आहे.
संभाव्य कोव्हॅक्सीनच्या निर्यातीसंदर्भातील चर्चेसाठी प्रीसिसा मेडिकामेंटोच्या एका चमूने गेल्या आठवड्यात भारत बायोटेकचा दौरा केला होता. या चमूने हैदराबाद येथील जीनोम व्हॅली येथील भारत बायोटेकच्या ऑफिसमध्ये 7 आणि 8 जानेवारीला डॉक्टर कृष्णा इला यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेत भारतातील ब्राझीलचे राजदूत आंद्रे अरणा कोरंगा डू लागो हेही व्हर्च्यूअली सहभागी जाले होते. यावेळी त्यांनी ब्राझील सरकारच्या वतीने कोव्हॅक्सीनच्या खरेदीसंदर्भात इच्छा व्यक्त केली होती.
सर्वसामान्य नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यासाठी ब्राझील सरकारकडून थेट तिची खरेदी केली जाईल. ब्राझीलच्या रेग्युलेटरी अथॉरिटी ANVISA कडून याला मंजुरी मिळाल्यानंतर ती बाजारात उपलब्ध होईल.
अशी आहे देशातील स्थिती -देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. काल दिवसभरात देशात 13 हजारांहून कमी रुग्ण आढळून आले. त्यामुळे देश लवकरच कोरोना संकटातून बाहेर पडू लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यातच आता कोरोना लसीकरणाची तयारीदेखील वेगानं सुरू झाली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून देशातल्या विविध राज्यांमध्ये कोरोनाची लस पाठवली गेली आहे.
देशात पहिल्या टप्प्यात कुणाला मिळणार लस -पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्सना कोरोनावरील लस देण्यात येईल. त्यानंतर पन्नाशी पार केलेल्या, गंभीर आजारांचा सामना करत असलेल्यांना लस टोचण्यात येईल. सध्याच्या घडीला सीरमच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. दोन्ही लसी भारतातच तयार झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांनादेखील याच लसी मिळतील.