व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांच्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ‘काळा इंग्रज’ संबोधले आहे, तर दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ३०० जागा जिंकून उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला असला तरी भाजपने समाजवादी पार्टीला गंभीर्याने घेतले आहे.
केजरीवाल पंजाबचे असले तरी त्यांना पंजाबबाबत काहीही माहिती नाही. आमच्यासाठी ते उपरे आहेत, असे चन्नी यांनी येथे एका कार्यक्रमात म्हटले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची आम आदमी पार्टी पंजाब विधानसभेत मुख्य विरोधी पक्ष आहे. दिल्लीतील शासनप्रणालीच्या नावावर मते मागत केजरीवाल समाजाच्या विविध घटकांंना मोठ-मोठी आश्वासने देत आहेत. आम आदमी पार्टी, शिरोमणी अकाली-बसपा युती सत्ताधारी पक्षाचे नुकसान करू शकतात. काँग्रेसने अद्याप उत्तरखंड आणि उत्तर प्रदेशात पक्षाचा चेहरा घोषित केलेला नाही. दुसरीकडे, मोदी आणि योगींच्या नावांवर उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकणार असल्याचे भाजप ठणकावून सांगत आहे. तथापि, महागाई, बेरोजगारी या मुद्द्याने भाजपचे नुकसान होईल आणि समाजवादी पार्टीला फायदा होईल, असे अंतर्गत सूत्र खासगीत मान्य करतात. आम आदमी पार्टीच्या उदयामुळे उत्तरखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसदरम्यान थेट लढत होणार नाही. गोव्यातील निवडणुकीत नेहमीच छोट्या स्थानिक पक्षांचा प्रभाव असतो. या राज्यांतील निवडणूकपूर्व संकेतानुसार प्रादेशिक पक्ष इतरांचे मनसुबे उधळून लावतील.